भाजपकडून राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीपदी ‘महिला’राज!

124

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच आश्चर्याचा धक्का देणार असल्याचे सांगितले जात आहे. कारण राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. मोदी हे आपल्या निर्णयप्रक्रियेतील धक्कातंत्रासाठी ओळखले जातात. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबतही पंतप्रधान मोदी याच तंत्राचा अवलंब करण्याच्या तयारीत असून या निवडणुकीत महिला नेत्यांना उमेदवारी देण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी अनेक ज्येष्ठ नेत्यांसोबत खलबतं केल्याची माहिती माध्यमातून समोर आली आहे.

… म्हणून भाजप देणार महिलांना संधी

पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीनंतर आता पुढील ३ महिन्यांमध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. जुलै अखेरीस राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपत असल्याने त्यांच्या जागी कोणाला संधी मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. आगामी राष्ट्रपतिपद महिलेला मिळू शकेल. विशेषत: आदिवासी महिलेला संधी दिली जाऊ शकते. इतकेच नाही तर पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या महत्त्वाच्या चार पदांपैकी सध्या कोणत्याही पदावर महिला नाही. या पार्श्वभूमीवरच राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतीपदावर एखाद्या महिला नेत्याला संधी देण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत.

(हेही वाचा – एसटीतील कंत्राटी भरतीचा निर्णय तूर्तास स्थगित!)

सध्याची परिस्थिती बघायची झाली तर पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष या चारही महत्त्वाच्या पदांवर पुरुष असल्याचे दिसतेय. त्यामुळे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती पदासाठी महिलेला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. बिहार, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपकडून चांगली कामगिरी करण्यात आली आहे. दोन्ही राज्यांत भाजपची सत्ता कायम असून त्यामागे महिला मतदारांचा मोठा वाटा आहे.

या महिला नेत्यांची नावे आघाडीवर

आतापर्यंत राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपद आदिवासी महिलेने भूषवलेले नाही. भाजप नेतृत्त्वाकडून ज्या नावांचा विचार केला जात आहे, त्यात लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसूया उईके, तेलंगणच्या राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन आणि झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांचा समावेश आहे. यापैकी मुर्मू आणि उईके आदिवासी समाजाच्या आहेत.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.