रशिया- युक्रेन युद्धादरम्यान आपला राष्ट्रध्वज असलेला तिरंगा भारतीयांचे सुरक्षा कवच म्हणून उदयास आल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते भारत-पाकिस्तान सीमेवरील कारगील येथे जानांसोबत दिवाळी साजरी करताना बोलत होते.
काय म्हणाले मोदी?
यावेळी पंतप्रधान म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी जेव्हा रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले त्यावेळी तेथे अडकलेल्या भारतीयांसाठी तिरंगा कसा संरक्षक कवच बनला हे सर्वांनी पाहिले. आज भारत अंतर्गत आणि बाह्य शत्रूंसोबत आघाडी घेत असल्याचेही मोदी यावेळी म्हणाले. दहशतवाद, नक्षलवाद, अतिरेकी कारवायांचे विचार मुळापासून नष्ट केली जात असून, आज देशहिताचे मोठे निर्णय वेगाने घेतले जात असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. देश गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त होतोय.
(हेही वाचा – ना OTP शेअर, ना कोणत्या लिंकवर क्लिक, तरीही बँक अकाउंट रिकामं…काय आहे प्रकार?)
राजपथ हे गुलामगिरीचे प्रतीक होते, आज ते कर्तव्य पथ बनून नव्या भारताची प्रतिमा दाखवत आहे. आता नौदलाच्या ध्वजात वीर शिवाजींची प्रेरणा जोडली गेल्याचे मोदींनी सांगितले. तसेच आज संपूर्ण जगाच्या नजरा भारताच्या वाढत्या ताकदीवर आहे. जेव्हा भारताची ताकद वाढते, तेव्हा शांततेची आशा वाढते आणि जगात संतुलन येत असल्याचे त्यांनी सांगितले.
देशाच्या सुरक्षेचा पैलू म्हणजे आत्मनिर्भर भारत
जवानांशी संवाद साधताना पंतप्रधान म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून सीमेवरील जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याची भाग्य लाभते आहे. कारगिलमध्ये भारतीय सैन्याने दहशतवादाचा मुकाबला करत देशाचे रक्षण केले होते. हा विजय देशासाठी एकप्रकारे दिवाळीचा उत्साह साजरा करण्यासारखाच होता. कारगिलची दिवाळी कधीच विसरता येणार नाही. कारगिलने प्रत्येक वेळी भारताचा विजय केला आहे. हे भारताच्या विजयाचे प्रतीक आहे, दिवाळी हा दहशतवाद्यांच्या अंताचा उत्सव आहे त्यामुळे मी कारगिलच्या आठवणी कधीच विसरू शकत नाही असे पंतप्रधानांनी सांगितले. देशाच्या सुरक्षेचा सर्वात महत्वाचा पैलू म्हणजे आत्मनिर्भर भारत, आधुनिक स्वदेशी शस्त्रे. मला आनंद आहे की, आज आपले सैन्य भारतात बनवलेल्या शस्त्रास्त्रांचा अवलंब करत आहे.
सीमा सुरक्षित तेव्हा देश सुरक्षित असतो
यावेळी सीमाभागात भारतीय जवान डोळ्यात तेल घालून देशाचे आणि देशवासियांचे रक्षण करत आहेत. भारतीय सैन्य आहेत म्हणूनच सगळे भारतीय सुरक्षित आहेत. पण जेव्हा देशाच्या सीमा सुरक्षित असतात तेव्हा देश सुरक्षित असतो आणि यामध्ये जवानांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. हे जवान हेच माझें कुटुंब असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.
Join Our WhatsApp Community