पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी कर्नाटक मधील शिवमोग्गा येथे ३,६०० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. तसेच शिवमोग्गा विमानतळाचे उद्घाटनही त्यांनी केले आणि तिथल्या सुविधांची पाहणी केली. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, केंद्रीय संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री उपस्थित होते.
पंतप्रधानांनी शिवमोग्गा येथे दोन रेल्वे प्रकल्पांची पायाभरणीही केली. ज्यात शिवमोग्गा-शिकारीपुरा-राणेबेन्नूर नवीन रेल्वे लाईन आणि कोटेगांगरु रेल्वे कोचिंग डेपो यांचा समावेश आहे. तसेच २१५ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध रस्ते विकास प्रकल्पांची पायाभरणीही त्यांनी यावेळी केली. त्यांनी जल जीवन मिशन अंतर्गत ९५० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या बहु-ग्राम योजनांचे उद्घाटन आणि पायाभरणी देखील केली. शिवमोग्गा शहरात ८९५ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या ४४ स्मार्ट सिटी प्रकल्पांचे उद्घाटनही त्यांनी केले.
उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी राष्ट्रकवी कुवेंपू यांच्या भूमीला वंदन केले, त्यांची एक भारत श्रेष्ठ भारत प्रति समर्पणाची भावना आजही कायम आहे. शिवमोग्गा येथे उद्घाटन करण्यात आलेल्या नव्या विमानतळाचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, आज बऱ्याच काळानंतर नागरिकांच्या गरजा पूर्ण झाल्या आहेत. विमानतळाचे भव्य सौंदर्य आणि बांधकाम यावर बोलताना पंतप्रधानांनी कर्नाटकच्या परंपरा आणि तंत्रज्ञानाचा संगम अधोरेखित केला. हा केवळ विमानतळ नाही तर एक अभियान आहे, ज्यात युवा पिढीची स्वप्ने भरारी घेऊ शकतील असे ते म्हणाले. ‘हर घर नल से जल’ प्रकल्पांसह ज्या प्रकल्पांची आज पायाभरणी होत आहे अशा रस्ते आणि रेल्वे प्रकल्पांचाही त्यांनी उल्लेख केला आणि त्या जिल्ह्यातील नागरिकांचे अभिनंदन केले.
पंतप्रधानांनी सोमवारी बी.एस.येडियुरप्पा यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि सार्वजनिक जीवनातील त्यांच्या योगदानाचे स्मरण केले. त्यांनी अलिकडेच विधानसभेत केलेले भाषण सार्वजनिक जीवनातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले. मोबाईलचे फ्लॅश लाइट उंचावून बीएस येडियुरप्पा यांना शुभेच्छा देण्याच्या पंतप्रधानांच्या विनंतीला उपस्थितांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आणि त्यांनी या ज्येष्ठ नेत्याप्रति प्रेम व्यक्त केले.
(हेही वाचा – नार्वेकरांच्या त्या चुकीबाबत बोलताना शिरसाटांचा मोठा दावा; म्हणाले, ‘त्यांच्या आमदारकीचा रस्ता शिंदे गटातून’)
Join Our WhatsApp Community