Modi Karnataka Visit: पंतप्रधान मोदी दोन दिवस कर्नाटक दौऱ्यावर

120

पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 आणि 21 जून 2022 रोजी कर्नाटक येथे दौऱ्यावर जाणार आहेत. आज 20 जून 2022 रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान बेंगलुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) येथे भेट देतील, त्याठिकाणी ते मेंदू संशोधन केंद्राचे (सेंटर फॉर ब्रेन रिसर्च-सीबीआर) उद्घाटन करतील आणि बागची पार्थसारथी मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाची पायाभरणी करतील. दुपारी पावणे दोनच्या सुमारास ते बेंगलुरू येथील डॉ. बी आर आंबेडकर स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (बीएएसई) येथे भेट देतील, याठिकाणी ते बीएएसई विद्यापीठाच्या नवीन प्रांगणाचे उद्घाटन करतील आणि डॉ. बी आर आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करतील.

कसं असेल दौऱ्याचं नियोजन

कर्नाटकमध्ये, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (आयटीआय) परिवर्तनातून विकसित 150 टेक्नॉलॉजी हब पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करतील. त्यानंतर दुपारी पावणेतीनच्या सुमारास, पंतप्रधान बेंगलुरू येथील कोम्माघट्टा येथे पोहोचतील, येथे ते 27000 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या अनेक रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. त्यानंतर संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान म्हैसूर येथील महाराजा कॉलेज मैदानावर सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील. तेथे नागनहुल्ली येथीस कोचिंग टर्मिनलचा पायाभरणी करतील आणि संप्रेषण विकार असलेल्या व्यक्तींसाठी, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग एआयआयएसएच मैसूर येथे सेंटर ऑफ एक्सलन्सदेखील राष्ट्राला समर्पित करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी सात वाजताच्या सुमाराला मैसूर येथील श्री सुत्तुर मठ येथे पंतप्रधान भेट देतील आणि पावणेआठच्या सुमारास, ते म्हैसूर येथील चामुण्डेश्वरी मंदिराला भेट देतील.

दुसऱ्या दिवशी 21 जून 2022 रोजी सकाळी 06:30 च्या सुमाराला मैसूर पॅलेस मैदानावर पंतप्रधान सामूहिक योग प्रात्यक्षिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

पंतप्रधानांचा बेंगलुरू दौरा

बेंगलुरू शहराचा संपर्क आणि दळणवळण वाढावे,यासाठीचे एक पाऊल म्हणून बेंगलुरू उपनगरीय रेल्वे प्रकल्पाचे (BSRP) भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. यामुळे बेंगलुरू शहर, परिसरातील उपनगरे आणि नवीन वसाहतींशी जोडले जाईल. या प्रकल्पासाठी सुमारे 15,700 कोटी रुपयांहून अधिक खर्च येणार असून यामध्ये एकूण 148 किलोमीटरहून अधिक लांबीच्या 4 कॉरिडोरच्या निर्मितीची योजना आहे. बेंगलुरू कॅन्टोन्मेंट पुनर्विकास आणि यशवंतपूर जंक्शन रेल्वे स्थानक विकास कामाचे भूमिपूजन देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या कामांसाठी अनुक्रमे सुमारे 500 कोटी आणि 375 कोटी रुपये खर्च येणार आहे.

आधुनिक विमानतळाच्या धर्तीवर विकसित, सुमारे 315 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या, बैयप्पनहळ्ळी इथल्या भारतातील पहिल्या वातानुकूलित सर एम. विश्वेश्वरय्या रेल्वे स्थानकाचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होईल. यासोबतच, कोकण रेल्वे मार्गावरील (अंदाजे 740 किमी) रोहा ( महाराष्ट्र ) ते ठाकूर ( कर्नाटक ) या स्थानकादरम्यान 100% विद्युतीकरण झालेल्या मार्गावर उडुपी, मडगाव आणि रत्नागिरी येथून चालणाऱ्या विद्युत रेल्वे गाड्यांना झेंडा दाखवून पंतप्रधान या प्रकल्पाचे लोकार्पण करतील. कोकण रेल्वे मार्गावरील या विद्युतीकरणासाठी 1,280 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च आला आहे. याखेरीज, दुहेरीकरण करण्यात आलेले दोन रेल्वे मार्ग प्रकल्प : अर्सिकेरे ते तुमकुर ( सुमारे 96 किमी) आणि येलाहंका ते पेनूकोंडा (सुमारे 120 की. मी) यांचे लोकार्पण पॅसेंजर आणि मेमु रेल्वेला झेंडा दाखवून पंतप्रधान करतील. या दोन्ही मार्गांच्या दुहेरीकरणासाठी अनुक्रमे 750 कोटी आणि 1,100 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी खर्च करण्यात आला आहे.

या दौऱ्यात, पंतप्रधान बेंगलुरू रिंग रोड प्रकल्पाच्या दोन भागाच्या बांधकामाची पायाभरणी करतील. सुमारे 2280 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे बेंगलुरू शहरातील वाहतूककोंडी कमी होईल. पंतप्रधान इतर काही रस्ते प्रकल्पांची देखील पायाभरणी करतील. यामध्ये, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरील नेलमंगला – तुमकुर दरम्यानच्या रस्त्याचे सहा पदरीकरण; राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 73 वरील पंजलकट्टे ते चारमंडी दरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण; राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 69 च्या काही भागाचा विकास आणि पुनर्वसन यांचा समावेश आहे. या सर्व प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे 3,150 कोटी रुपये आहे.

(हेही वाचा – मुंबईसह संपूर्ण कोकणात सोमवारपासून अतिवृष्टीचा इशारा )

बेंगलुरू शहरापासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुद्दलिंगनहळ्ळी इथे सुमारे 1,800 कोटी रुपये गुंतवून बांधण्यात येणाऱ्या मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्कची पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते केली जाणार आहे. यामुळे वाहतूक, हाताळणी तसेच दुय्यम मालवाहतूक खर्च कमी होईल. पंतप्रधानांच्या हस्ते बेंगलुरू शहरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या ( BASE) नव्या परिसराचे उद्घाटन केले जाणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची स्वतंत्र भारताच्या विकासातील अनुकरणीय योगदानाची ओळख म्हणून तसेच त्यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली रूपात 2017 मध्ये हे निवासी विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे.

150 टेक्नॉलॉजी हबचे लोकार्पण

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथल्या कार्यक्रमादरम्यान, संपूर्ण कर्नाटक राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचा (ITIs) कायापालट करून नव्याने उभारण्यात आलेल्या 150 टेक्नॉलॉजी हबचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते केले जाईल. या अभिनव उपक्रमासाठी सुमारे 4 600 कोटी रुपये खर्च आला असून या खर्चात अनेक औद्योगिक संस्थांनी योगदान दिले आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश औद्योगिक क्षेत्रासाठी आवश्यक असलेले कौशल्य युक्त मनुष्यबळ 4.0 तयार करणे हा आहे. हे टेक्नॉलॉजी हब विविध नवोन्मेषी अभ्यासक्रद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाचे सर्वोत्तम कौशल्य प्रशिक्षण देऊन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या स्नातकांना रोजगाराच्या आणि नव व्यवसायाच्या नव्या संधी प्राप्त करून देतील.

बेंगलुरूमध्ये भारतीय विज्ञान संस्थेत, पंतप्रधान एका मेंदू संशोधन केंद्राचे (CBR) उद्घाटन करतील. या संशोधन केंद्राची पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते झाली होती. वयानुरूप होणाऱ्या मेंदूच्या आजारांवरील उपचारांच्या प्रमाण आधारित संशोधनासाठी हे केंद्र उभारण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते 832 खाटांच्या बागची पार्थ-सारथी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाची पायाभरणी केली जाईल. हे रुग्णालय बेंगलुरू मधील भारतीय विज्ञान संस्थेच्या परिसरात उभारण्यात आले असून यामुळे विज्ञान, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शाखांना एकत्रीकृत संशोधन करणे शक्य होणार आहे. यामुळे देशात चिकित्सा विषयक संशोधनाला चालना मिळणार आहे तसेच यातून संशोधित होणाऱ्या नव नव्या उपचार पद्धतीमुळे देशात आरोग्य सेवेमध्ये सुधारणा घडणार आहे.

पंतप्रधानांचा मैसूर दौरा

मैसूरमधल्या महाराजा महाविद्यालय मैदानावर होणाऱ्या एका सार्वजनिक कार्यक्रमात, पंतप्रधान 180 कोटी रुपये खर्चून नागनहुळ्ळी रेल्वेस्थानक येथे उभारण्यात करण्यात येणाऱ्या उपनगरीय वाहतूकीसाठी कोचिंग टर्मिनलची पायाभरणी करतील. कोचिंग टर्मिनल मध्ये मेमु शेडची सुविधा असणार आहे त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या मैसूर यार्डातील वाहतूक कोंडी कमी होऊन मैसूर स्थानकातून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या तसेच मेमू रेल्वे गाड्यांची संख्या वाढेल, याची परिणती म्हणून मैसूरचा संपर्क वाढून पर्यटनला चालना मिळेल. याचा फायदा रोज प्रवास करणारे प्रवासी तसेच लांब अंतरावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील होईल.

या दौऱ्यात, मैसूर येथील अखिल भारतीय वाचा आणि श्रवण संस्थेत उभारण्यात आलेल्या सेंटर फॉर एक्सलन्स फॉर परसन्स विथ कम्युनिकेशन डीसॉर्डर चे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होईल. या केंद्रात संप्रेषण कमतरता असलेल्या लोकांच्या निदान, परिक्षण आणि पुनर्वसनासाठी आवश्यक असलेल्या अनेक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

पंतप्रधानांचा 21 जूनचा कार्यक्रम

आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला 21 जून 2022 या दिवशी मैसूरमधल्या मैसूर पॅलेस मैदानावर होणाऱ्या योग प्रात्यक्षिक कार्यक्रमात हजारो सहभागींसह पंतप्रधानही सहभागी होतील. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात 8 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशभरात 75 वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणी 75 केंद्रीय मंत्र्यांच्या नेतृत्वात योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे, पंतप्रधानांच्या नेतृत्वातील मैसूर येथील योग प्रात्यक्षिक आयोजन त्यापैकीच एक आहे. देशभरात अनेक शैक्षणिक, सामाजिक, राजकीय , सांस्कृतिक, धार्मिक, कार्पोरेट तसंच इतर नागरी संस्थांनी योग प्रात्यक्षिकांचे कार्यक्रम आयोजित केले असून त्यामध्ये करोडोंच्या संख्येने नागरिक सहभागी होणार आहेत.

पंतप्रधानांचा मैसूर येथील योग प्रात्यक्षिक कार्यक्रम हा देखील गॉर्जियन योग रिंग या अभिनव कार्यक्रमाचा भाग आहे. हा कार्यक्रम देशांच्या सीमा ओलांडत योगाचा प्रभाव सर्व जगात पसरवण्याच्या उद्देशाने 79 राष्ट्रांमध्ये तसेच संयुक्त राष्ट्रांमध्ये साजरा केला जाणार आहे. ज्याप्रमाणे सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे संक्रमण करत जाताना दिसतो, त्याच प्रमाणे, योगदिनी जगभरात सहभागी देशांमध्ये एकापाठोपाठ एक अशी महा योग प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. यामध्ये ‘एक सूर्य – एक पृथ्वी’ ही संकल्पना दिसून येईल. या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण 21 जून या दिवशी डीडी इंडिया या वाहिनीवरून भारतीय वेळेनुसार सकाळी 3 वाजल्यापासून ( फिजी येथून प्रक्षेपण ) भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजेपर्यंत ( अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्को येथून प्रक्षेपण ) केले जाणार आहे. याच कार्यक्रमाचा भाग म्हणून पंतप्रधानांच्या मैसूर येथील योग प्रात्यक्षिकाचे थेट प्रक्षेपण इंडिया या वाहिनीवरून भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 6:30 वाजता करण्यात येईल.

जगभरात 2015 पासून 21 जून या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. यावर्षीच्या योग दिनाची मुख्य संकल्पना मानवतेसाठी योग अशी आहे. या वर्षीची संकल्पना कोविड महामारीच्या काळातील मनुष्याच्या वेदना कमी करण्यात योग क्रिया कशी लाभदायक ठरली याची दर्शक आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.