वेदांता-फॉक्सकॉनवरील वादावरुन मोदींचा शिंदेंना फोन, म्हणाले…

83

सेमीकंडक्टर उत्पादक कंपनी वेदांता-फॉक्सकॉन ग्रुपचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यामुळे एक नवा वाद उसळला आहे. यावरुन विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्यात येत असतानाच आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत फोन केला असून राज्याच्या विकासासाठी एक वेगळे आश्वासन दिल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

वेदांता-फॉक्सकॉन ग्रुपचा हा प्रकल्प तब्बल 1 लाख 54 हजार कोटी रुपयांचा असून यामुळे राज्यात मोठी रोजगार निर्मिती होणार असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे इतका महत्वाचा प्रकल्प गुजरातला नेल्यामुळे विरोधी पक्षांकडून राज्य सरकारवर आरोप करण्यात येत आहेत.

मोदींनी दिले आश्वासन

पण याच पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर चर्चा करुन वेदांता-फॉक्सकॉनच्या तोडीचा प्रकल्प महाराष्ट्राला देण्यात येईल, असं आश्वासन दिलं असल्याचे उदय सामंत यांनी म्हटलं आहे. तसेच महाराष्ट्रातील बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकार राज्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असा विश्वासही मोदींनी यावेळी दिला असल्याचे उद्योगमंत्री सामंत यांनी सांगितले आहे.

काय आहे प्रकरण?

या प्रकल्पाबाबत कंपन्यांसोबत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली होती. त्यावेळी सरकारकडून ज्या सवलती देणे शक्य आहे त्या देऊन प्रकल्पउभारणीसाठी तळेगावजवळील 1100 एकर जमीन देऊ केली होती. पण बुधवारी अचानक हा प्रकल्प गुजरातमध्ये स्थापन करण्याची घोषणा कंपनीने केली. त्यामुळे नवा वाद उफाळून आला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.