‘त्यांचा काळी जादू करण्याचा प्रयत्न, पण…’, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर निशाणा

79

राष्ट्रीय तपास यंत्रणांचा केंद्र सरकारकडून गैरवापर होत असल्याचे सांगत काँग्रेसने 5 ऑगस्ट रोजी देशव्यापी आंदोलन छेडले होते. यावेळी राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक दिग्गड नेत्यांनी काळे कपडे परिधान करत केंद्र सरकारचा निषेध केला होता. पण यावरच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निशाणा साधला आहे.

काळे कपडे घालत काही लोक काळी जादू करण्याचा प्रयत्न करत अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत आहेत. पण जनतेचा त्यांच्यावर कधीही विश्वास बसणार नाही, असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.

नैराश्यातून काळ्या जादूकडे

देशात काही लोक निराशेच्या गर्तेत बुडाले असून नकारात्मकतेच्या भोव-यात सापडले आहेत. त्यामुळे ते सातत्याने सरकारविरोधात खोटं बोलत आहेत. पण देशातील जनता त्यांच्यावर विश्वास ठावायला तयार नाही, त्यामुळे आलेल्या नैराश्यातून हे लोक आता काळ्या जादूकडे वळत असल्याचे दिसत आहे, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसच्या आंदोलनावर खोचक टीका केली आहे.

जनता विश्वास ठेवणार नाही

काळी जादू पसरवण्याचा यांनी कसा प्रयत्न केला ते देशाने 5 ऑगस्ट रोजी पाहिलं आहे. त्यासाठी त्यांनी काळे कपडे परिधान केले. काळे कपडे घातल्याने आपले नैराश्य दूर होईल असे त्यांना वाटत आहे. पण त्यांनी कितीही काळी जादू केली, अंधश्रद्धेवर विश्वास ठेवला तरी जनतेच्या मनात त्यांच्याबाबत कधीही विश्वास निर्माण होऊ शकत नाही, अशी टीकाही नरेंद्र मोदींनी काँग्रेस नेत्यांवपर केली आहे.

स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान करण्याचा प्रयत्न

त्यासोबतच मोदींनी आम आदमी पार्टीवर देखील निशाणा साधला आहे. देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. त्यासाठी देश तिरंग्याच्या रंगांत रंगला आहे. पण या पवित्र सोहळ्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. आपल्या महान स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान करण्याचा डाव त्यांनी आखला आहे. त्यामुळे आपण त्यांची मानसिकता ओळखणं गरजेचं आहे, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना टोला लगावला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.