2002 गुजरात दंगल प्रकरणः मोदींच्या विरोधातील याचिकेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

186

2002 साली गुजरात येथे झालेल्या दंगलीप्रकरणात राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे पंतप्रधान यांना न्यायालयाने क्लीन चिट दिली होती. त्याला आव्हान देणारी याचिका आता सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली असून, मोदी यांना देण्यात आलेली क्लीन चिट कायम ठेवली आहे.

मोदींना क्लीन चिट

2002 साली झालेल्या गुजरात दंगलीप्रकरणी चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. एसआयटीच्या अहवालात नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट देण्यात आली होती. या अहवालाविरोधात काँग्रेसच्या नेत्या एहसान जाफरी यांच्या पत्नी झाकिया जाफरी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. ही याचिका आता सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. याप्रकरणी न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी, ए एम खानविलकर आणि सी टी रविकुमार यांच्या खंडपीठाने निकाल दिला आहे. याबाबतचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने सात महिन्यांपूर्वी म्हणजेच 9 डिसेंबर 2021 रोजी राखून ठेवला होता.

(हेही वाचाः सर्वाधिक वेळा मी निवडून आलो, मला अपेक्षा होती! शिवसेना आमदाराचं मंत्रीपदावरुन वक्तव्य)

काय आहे प्रकरण?

28 फेब्रुवारी 2002 रोजी अहमदाबाद येथील गुलबर्गा सोसायटीत झालेल्या दंगलीत जाळपोळ झाली होती. यामध्ये काँग्रेसचे खासदार एहसान जाफरी यांच्यासह 68 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते. या दंगलीचा एसआयटीने तपास केला. या तपासामध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट देण्यात आली होती. याविरोधात एहसान जाफरी यांच्या पत्नी झाकिया जाफरी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आता सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.