मोदींच्या पदवीवरून उद्धव ठाकरेंची टीका, अजित पवार म्हणतात विषय महत्वाचा नाही

109

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानांच्या डिग्रीसंदर्भात केलेल्या मागणीवरुन गुजरात उच्च न्यायालयाने त्यांना 25 हजारांचा दंड ठोठावला. त्यानंतर वज्रमूठ सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी यावर टीका केली, डिग्री लपवण्याची काय गरज? जनतेला समजून घेण्याचा अधिकार नाही का?, असा सवाल केला. त्यावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी मात्र हा विषय महत्वाचा नाही, महागाई आणि बेरोजगारी हे विषय महत्वाचे असल्याचे सांगत या विषयाला गौण ठरवले.

काय म्हणाले अजित पवार? 

2014 ला त्यांची डिग्री पाहून त्यांना निवडून दिलं आहे का? मोदींनी देशात 2014 ला स्वत:चा करिश्मा निर्माण केला. यापूर्वी भाजपाचा हा असा करिश्मा जम्मू-काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत नव्हता. त्याचे सर्व श्रेय मोदींनाच दिलं पाहिजे. डिग्रीवर काय? आधीच्या काळापासून आतापर्यंत जे देशाचे पंतप्रधान किंवा वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री झाले त्यांना आपल्या लोकशाहीमध्ये बहुमताचा आदर करुन निवडण्यात आलं. इथं 543 ची संख्या आहे. त्यात ज्याचं बहुत असेल तो तिथं प्रमुख होतो. आपल्या राज्यात 146 चं ज्याचं बहुमत असेल तो त्या ठिकाणी मुख्यमंत्री होतो, असे अजित पवार म्हणाले. राजकारणात शैक्षणिक पात्रता महत्त्वाची नसते. शिक्षणाच्या बाबतीत एमबीबीएस वगैरे झाल्याशिवाय डॉक्टर म्हणून काम करु शकत नाही पण असं काही राजकारणात नाही. त्यामुळे ते 9 वर्ष तुमच्या, माझ्या देशाचं प्रतिनिधित्व करतात. आता डिग्रीचं काढून काय होणार. मी अनेकदा बघतो मध्येच पंतप्रधानांच्या डिग्रीचा विषय काढला जातो. मंत्र्यांच्या डिग्रीचा विषय काढला जातो. तो महत्त्वाचा प्रश्न आहे का? नाही महागाई आणि बेरोजगारीचा प्रश्न महत्त्वाचा आहे. महागाईचा आगडोंब उसळलेला आहे. त्याबद्दल बोलायचं नाही, चर्चा करायची नाही. सगळी मुलं मुली आम्हाला कधी नोकऱ्या मिळणार विचारत आहेत. 75 हजारांची भरती होणार होती वेगवेगळ्या विभागांमध्ये त्याचं काय झालं? ते सोडून हा काय विषय चर्चेत आहे? शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, कामगारांचे प्रश्न आहेत, असेही अजित पवार म्हणाले.

(हेही वाचा ‘हिंदु राष्ट्र’ संकल्पनेला छेद देणाऱ्यांचा प्रयत्न हाणून पाडण्याची आवश्यकता! – रमेश शिंदे)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.