पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, गुरूवारी महाराष्ट्र सरकारच्या रोजगार मेळाव्याला व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. पंतप्रधानांनी, धनत्रयोदशीच्या दिवशी केंद्रीय स्तरावर रोजगार मेळाव्याच्या संकल्पनेचा शुभारंभ केला. केंद्र सरकारच्या पातळीवर 10 लाख नोकऱ्या देण्याच्या मोहिमेची ही सुरुवात होती. तेव्हापासून पंतप्रधानांनी गुजरात आणि जम्मू-काश्मीर सरकारच्या रोजगार मेळाव्यांना संबोधित केले आहे. इतक्या कमी कालवाधीत झालेले रोजगार मेळाव्याचे आयोजन पाहता महाराष्ट्र सरकार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृढ संकल्पाने वाटचाल करत आहे. येत्या काळात महाराष्ट्रात अशा रोजगार मेळाव्यांचा अधिक विस्तार होईल याचा मला आनंद आहे. महाराष्ट्राचा गृह विभाग आणि राज्याच्या ग्रामीण विकास विभागात हजारो नियुक्त्या होणार, आहेत असे मोदी यांनी सांगितले.
या प्रकल्पांचे काम लवकरच सुरू होणार
देशभरात आज पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रात सरकार करत असलेली विक्रमी गुंतवणूक रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करत आहे. महाराष्ट्राबाबत बोलताना मोदी म्हणाले की, केंद्र सरकारने राज्यासाठी 2 लाख कोटींहून अधिक मूल्याच्या साधारण 225 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यासह 75 हजार कोटी रुपयांचे रेल्वे प्रकल्प आणि आधुनिक रस्त्यांच्या 50 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पांचे काम लवकरच सुरू होणार आहे, असे ते म्हणाले.
(हेही वाचा – ‘इथे आमची गरजच काय?’, सीबीआय म्हणते या राज्यात एकही भ्रष्टाचाराची तक्रार नाही)
बदलत्या काळात नोकऱ्यांचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे, सरकारही विविध प्रकारच्या नोकऱ्यांसाठी सतत संधी निर्माण करत आहे. मुद्रा योजना तरुणांना तारणमुक्त कर्ज देत असून 20 लाख कोटी रुपयांचे कर्ज यापूर्वीच वितरित केले गेले आहे. त्याचप्रमाणे, स्टार्ट-अप आणि एमएसएमई क्षेत्राला मोठ्या प्रमाणात पाठबळ दिले जात आहे. महाराष्ट्रातील तरुणांना याचा फायदा झाला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
सरकारच्या प्रयत्नांबाबतची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या या संधी दलित-मागास, आदिवासी, सामान्य वर्ग आणि महिला सर्वांना समान प्रमाणात उपलब्ध होत आहेत. यावर मोदींनी भर दिला. बचत गटांशी जोडलेल्या 8 कोटी महिलांना मिळालेल्या 5 लाख कोटी रुपयांच्या मदतीचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. सरकार पायाभूत सुविधांवर एवढा मोठा खर्च करते, तेव्हा रोजगाराच्या लाखो नवीन संधी निर्माण होतात, अशा शब्दात मोदींनी समारोप केला.
Join Our WhatsApp Community