कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाचे राष्ट्रार्पण सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बंगळुरू येथून झाले. कोकण रेल्वेच्या शंभर टक्के विद्युतीकरणाचा एक महत्त्वाचा टप्पा आपण पाहिला आहे. ‘मिशन शंभर टक्के विद्युतीकरण’ अभियानाच्या उल्लेखनीय यशाबद्दल आणि शाश्वत विकासाचे नवे मानदंड स्थापित केल्याबद्दल कोकण रेल्वे टीमचे अभिनंदन करतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. रत्नागिरी, मडगाव आणि उडुपी या तीन स्थानकांवर विशेष कार्यक्रमांचे आयोजन कोकण रेल्वेने केले होते. या तिन्ही स्थानकांवर उभ्या असलेल्या विजेचे इंजिन असलेल्या गाड्या पंतप्रधानांनी बंगळुरूमध्ये हिरवा झेंडा दाखविल्यानंतर रवाना झाल्या.
(हेही वाचा – मुंबई उच्च न्यायालयाचे दोन न्यायमूर्ती बनले मुख्य न्यायमूर्ती! )
कोकण रेल्वेने गाठला आणखी एक टप्पा
यावेळी दिलेल्या माहितीनुसार कोकण रेल्वेची स्थापना १९९० साली रोहा ते ठोकूरदरम्यान रेल्वे मार्ग बांधण्यासाठी कंपनी म्हणून करण्यात आली. या संपूर्ण मार्गावर २६ जानेवारी १९९८ रोजी पहिली गाडी रवाना झाली. त्यानंतर १ मे १९९८ रोजी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी कोकण रेल्वेचे राष्ट्रार्पण केले. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्युतीकरणाचे उद्धाटन केल्यानंतर कोकण रेल्वेने आणखी एक टप्पा गाठला आहे. रत्नागिरीत कार्यक्रमादरम्यान कोकण रेल्वेच्या वाटचालीची माहिती देण्यात आली. रत्नागिरीचे विभागीय व्यवस्थापक विवेक शेंड्ये यांच्यासह अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.
विद्युतीकरणाचे काम ५ टप्प्यांमध्ये पूर्ण
कोकण रेल्वेच्या संपूर्ण ७४० किलोमीटर्स लांबीच्या विद्युतीकरणाचे काम ५ टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात आले. ठोकूर ते बिजूर, बिजूर ते कारवार, कारवार ते थिवी, थिवी ते रत्नागिरी आणि रत्नागिरी ते रोहा असे ते पाच टप्पे होते. रेल्वेच्या ७४० किलोमीटर्सपैकी सर्वाधिक ३८२ किलोमीटर्सचा मार्ग महाराष्ट्रात म्हणजेच कोकणात आहे. गोव्यातून १०६ किलोमीटर्स लांबीचा, तर कर्नाटकातून २५२ किलोमीटर्स लांबीचा कोकण रेल्वेमार्ग जातो.या रेल्वेमार्गावर एकूण ९७० किलोमीटर्स लांबीच्या ट्रॅकचे विद्युतीकरण करण्यात आले. त्यापैकी ५१३ किलोमीटर्स अंतर महाराष्ट्रातील, १६३ किलोमीटर्स अंतर गोव्यातील, तर २९४ किलोमीटर्स अंतर कर्नाटकातील आहे. या विद्युतीकरणासाठी १२८७ कोटी रुपये खर्च आला. मार्च २०२२ मध्ये हे विद्युतीकरण पूर्ण झाले.
इंधनावरच्या खर्चात ७० टक्के बचत होणार
विद्युतीकरणामुळे इंधनावरच्या खर्चात जवळपास ७० टक्के बचत होणार आहे. त्यामुळे वार्षिक सुमारे १५० कोटी रुपयांची बचत होणार आहे. डिझेलची गरज कमी झाल्याने आयातीवरच्या खर्चात बचत. त्यामुळे परकीय चलनाची बचत होणार आहे. विजेवरच्या गाड्यांमुळे प्रदूषण होणार नाही. कोकण रेल्वेमार्ग पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या पश्चिम घाटातून जातो. त्यामुळे प्रदूषण घटणे ही महत्त्वाची बाब ठरणार आहे. आवश्यक असलेल्या इंजिन्सची संख्या घटेल. सर्व ट्रॅक्सचे विद्युतीकरण झाल्यामुळे इंजिन बदलायला लागणाऱ्या वेळेत आता बचत होणार आहे. पूर्वी ट्रॅकच्या आवश्यकतेनुसार लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांचे इंजिन बदलून डिझेल किंवा विजेवरील इंजिन लावावे लागे. त्यात वेळ जात होता.
२०१६ साली कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाला मंजुरी
भारतीय रेल्वेमार्गावरील आव्हानात्मक मार्गांपैकी एक असलेल्या कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास आता आणखी वेगवान होणार आहे. रेल्वे मंत्रालयाने २०१६ साली कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाला मंजुरी दिली होती. कोकण रेल्वेवर विद्युतीकरण झाले नसल्याने डिझेल इंजिनाच्या मदतीने या मार्गावर रेल्वे वाहतूक होत असे. साधारणपणे १२ डब्यांच्या रेल्वेगाडीला एक किलोमीटर अंतर कापण्यासाठी ६ ते १० लिटर डिझेलची आवश्यकता असते. इंजिनाच्या अश्वशक्ती क्षमतेनुसार यात बदल होतो. आता विद्युतीकरण झाल्यामुळे इंधनाची बचत होणार असून विद्युतीकरणामुळे वाहतुकीच्या प्रतिएकक खर्चात १८ टक्के घट होणार आहे. प्रवाशांना वेगवान आणि प्रदूषणमुक्त वातावरणात प्रवास करणे शक्य होणार आहे. कोकण रेल्वेचा मार्ग आव्हानात्मक आहे. त्यातच करोना महामारीच्या काळात हा प्रकल्प पूर्ण करणे अधिक आव्हानात्मक झाले होते. पण तेव्हाही काम सुरू होते. कोकणात कोसळणाऱ्या मुसळधार पावसात व विद्युतीकरणाच्या कामात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी अनेक ठिकाणी विशेष व्यवस्था करावी लागली होती.
Join Our WhatsApp Community