अलीकडे राजकारणात ‘शॉर्ट कट’ पद्धत अस्तित्वात आली आहे. त्याच्या नादात काही राजकीय पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी सामान्य करदात्यांच्या पैशावर डल्ला मारत आहेत. असे लोक कधीच देश घडवू शकत नाहीत. त्यामुळे करदात्यांनी अशा राजकारण्यांचा वेळीच हिशेब चुकता केला पाहिजे, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केला.
( हेही वाचा : फडणवीसांच्या गाडीतून समृद्धीवर प्रवास केला, पण त्यांनी पोटातील पाणी हलू दिले नाही – मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी)
बहुप्रतिक्षित हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे रविवारी, ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यानिमित्ताने नागपूर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
मोदी म्हणाले, काही राजकीय पक्ष केवळ स्वार्थ आणि सत्तेसाठी राजकारण करतात. असे लोक कधीच देश घडवू शकत नाहीत. पहिल्या तीन औद्योगिक क्रांतीच्या वेळेस भारत काहीसा मागे राहिला. पण आता चौथ्या औद्योगिक क्रांतीत भारत मागे राहणार नाही. काही वर्षांपूर्वी सिंगापूरही एक साधे बेट होते. पण त्यांनी अभूतपूर्व बदल घडवत स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले. त्यामुळे प्रत्येक करदात्याला आवाहन की, अशा स्वार्थी राजकीय पक्षांना दूर सारा. अन्यथा ते देशाला पोखरून ठेवतील.
भाषणाची मराठीतून सुरुवात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली. ‘आज संकष्टी चतुर्थी आहे. कोणतेही शुभकाम करताना आपण गणेशपूजन करतो. आज नागपुरात आहोत, तर टेकडीच्या गणपतीबाप्पाला माझे नमन’, असे मोदींनी म्हणताच ‘देखो देखो कौन आया, शेर आया… शेर आया अशी घोषणाबाजी’ उपस्थित कार्यकर्ते आणि नागरिकांनी केली.
Join Our WhatsApp Community