देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीत बसून मी समृद्धीवरून वेगवान प्रवास केला. पण त्यांनी पोटातील पाणीसुद्धा हलू दिले नाही. हे त्यांच्या कौशल्यासह रस्त्याच्या गुणवत्तापूर्ण कामाचे द्योतक आहे, अशी टोलेबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
( हेही वाचा : बहुप्रतिक्षित ‘समृद्धी महामार्गा’चे पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण )
बहुप्रतिक्षित हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे रविवारी, ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यानिमित्ताने नागपूर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी माझ्याकडे समृद्धी महामार्गाची जबाबदारी दिली. पण, त्यात अनेकांनी अडथळे आणण्याचे काम केले. शेतकऱ्यांनी जमिनी देऊ नयेत, यासाठी प्रयत्न केले, गावागावांत जाऊन बैठकाही घेतल्या. पण आम्ही सर्व अडथळ्यांवर मात करीत यशस्वी झालो, अशी टीकाही त्यांनी नाव न घेता केली.
समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा शिर्डीपर्यंत पोहोचला आहे. येत्या ८-१० महिन्यांत मुंबईपर्यंतचा मार्ग खुला होईल. हा नुसता महामार्ग नसून, महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा आहे, असे शिंदे म्हणाले. ‘आम्ही मेहनत करणारे लोक आहोत. त्यामुळे आपले आशीर्वाद आणि सहकार्य कायम ठेवा’, असे आवाहनही त्यांनी पंतप्रधान मोदी यांना यावेळी केले.
‘समृद्धी’लगत सेमी हायस्पीड रेल्वे – फडणवीस
- समृद्धी महामार्ग हा खऱ्या अर्थाने बहुउद्देशीय प्रकल्प आहे. या महामार्गालागत सेमी हायस्पीड रेल्वे सुरू करण्यासाठी आम्ही जागा राखीव ठेवली आहे. येत्या काळात त्यासंबंधी कार्यवाही सुरू केली जाईल.
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केवळ एकमेव होते, ज्यांनी या महामार्गासंदर्भात माझ्यावर पहिल्या दिवसापासून विश्वास ठेवला. त्यावेळसच्या त्यांच्या नेत्यांनी मात्र या रस्त्याला विरोध केला होता. पण शिंदेंनी करारावर स्वाक्षरी केली आणि ९ महिन्याच्या विक्रमी वेळेत भूसंपादन शक्य झाले.
- येत्या १० वर्षांत या महामार्गातून ५० हजारांची कमाई होईल. ती अन्य प्रकल्पात वापरली जाईल.महामार्गलगत गॅस लाईन टाकण्यात आली आहे. त्यामुळे १० जिल्ह्यांत थेट सीएनजी गॅस जोडणी देता येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.