मोदी हे केवळ नेतृत्व नव्हे, देशाचे सामर्थ्य – निर्मला सीतारामन

145

समाजकार्य करताना ज्यांनी कधी साधा सरपंच व्हायची मनीषा बाळगली नाही, त्या नरेंद्र मोदींच्या हातात पक्षाने थेट मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली. त्यानंतर पंतप्रधान पदाची धुरा त्यांच्या खांद्यावर टाकली. पण, आपल्या नेतृत्व कौशल्याच्या जोरावर त्यांनी भारताला जागतिक पटलावर मानाच्या स्थानी आणून ठेवले. त्यामुळे मोदी हे केवळ नेतृत्व नव्हे, तर देशाचे सामर्थ्य आहेत, असे उद्गार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी काढले.

( हेही वाचा : रॉजर फेडररने केली निवृत्तीची घोषणा; हा असणार शेवटचा सामना )

मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २० वर्षांच्या पारदर्शक प्रशासकीय जीवनावर आधारित ‘मोदी@२०’ या पुस्तकावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वांद्रे-कुर्ला संकुलात पार पडलेल्या या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सीतारामन बोलत होत्या. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, खासदार पूनम महाजन, मनोज कोटक, गोपाळ शेट्टी, आमदार सुनील राणे, प्रवीण दरेकर, मनीषा चौधरी, अमित साटम, राज पुरोहित, पराग आळवणी उपस्थित होते.

सीतारामन म्हणाल्या, नरेंद्र मोदींनी कधी सरपंच, नगरसेवक वा आमदार व्हायची मनीषा बाळगली नाही. पक्षाने त्यांना थेट मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली. त्यानंतर ते आमदारकीची निवडणूक लढले आणि विजयी झाले. देशभरात काँग्रेसचे राज्य असताना त्यांनी गुजरातमध्ये अव्वल दर्जाचा विकास घडवून दाखवला. पदरी प्रशासकीय बाबींचा कोणताही अनुभव नसताना, अगदी अल्पावधीत त्यांनी प्रशासनावर वकुब मिळवले. गुणांवर विश्वास ठेवून पक्षाने त्यांच्या हातात नेतृत्व दिले. आज ते जगाला दिशा दाखवण्याचे काम करीत आहेत.

…म्हणून मोदी इतरांपेक्षा वेगळे

नेतृत्व कसे असावे, याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे नरेंद्र मोदी. भारतात कोरोना आला, तेव्हा आपल्याकडे हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याही प्रयोगशाळा नव्हत्या, चाचण्या करण्याची सुविधा नव्हती. पण मोदींनी तातडीने पावले उचलून आरोग्य क्षेत्रात परिवर्तन घडवून आणले. जगभरात लशींचा तुटवडा असताना, सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारतात त्यांनी लसीकरणाचा नियोजनबद्ध कार्यक्रम आखून दिला. ते नुसते नेतृत्व करीत नाही, तर जबाबदारी स्वीकारतात. त्यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे आहेत, असेही सीतारामन म्हणाल्या.

पुस्तकातला प्रत्येक धडा, नेतृत्व घडवणारा

  • पंतप्रधान पदाची धुरा हाती घेतल्यानंतर त्यांनी शेजारील राष्ट्रांशी संबंध सुधारले, आपत्तीकाळात त्यांना मदत केली.
  • गावात वीज, पाणी पोहोचले; पण घरात पोहोचले का, याचा आजवर कोणी विचार केला नव्हता. मोदींनी तो केला.
  • प्रत्येक घरात सरकारची योजना पोहोचते आहे का, याचा ते स्वतः आढावा घेतात.
  • त्यांची काम करण्याची क्षमता अफाट आहे. ते कधी थकलेले दिसत नाहीत. म्हणूनच ‘सबका साथ, सबका विकास’ साध्य करण्यात यश मिळाले आहे.
  • देशातला प्रत्येक व्यक्ती स्वावलंबी बनावा, याकडे ते विशेष लक्ष देत आहेत.
  • जगातल्या कुठल्याही विद्यापीठात मिळणार नाही, असे शिक्षण मोदींच्या सानिध्यात मिळते.
  • त्यांच्या या पुस्तकातला प्रत्येक धडा, नेतृत्व घडवणारा आहे. त्यामुळे प्रत्येकाने ते वाचावे, असा माझा आग्रह आहे, असेही सीतारामन म्हणाल्या.

निष्कलंक सेवेचे मूर्तिमंत उदाहरण – शेलार

राजकारणात राहून निष्कलंकपणे जनतेची सेवा कशी केली जाते, त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. आधी गुजरातचे मुख्यमंत्री आणि नंतर देशाचे पंतप्रधान झाल्यावर त्यांनी अव्यवस्थेला व्यवस्थेमध्ये परिवर्तित केले. संपूर्ण देशाला सोबत घेऊन जाणारा हा एकमेव नेता आहे. पंतप्रधान पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर एक-एक विभागाच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. सुशासन करताना भ्रष्ट्राचाराला मूठमाती दिली. ‘मोदी@२०’ हे पुस्तक नरेंद्र मोदींच्या १२ वर्षे मुख्यमंत्री आणि ८ वर्षे पंतप्रधान पदाच्या पारदर्शक कार्यपद्धतीवर प्रकाश टाकते. हे पुस्तक प्रत्येकाला मार्गदर्शक ठरेल, असे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.