मोदींनी नेमके कोणत्या ठाकरेंचे ऐकले?

मुख्यमंत्र्यांसोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मोदींना पत्र लिहिले होते. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी नेमके कोणत्या ठाकरेंचे ऐकले, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.

75

केंद्र सरकारकडून हाफकिन इनस्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानगी देण्यात आली असून, आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे राज्यात लसीकरण वाढावे, यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मोदींना पत्र लिहिले होते. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी नेमके कोणत्या ठाकरेंचे ऐकले, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. केंद्र आणि राज्य सरकारमधील वाद बघता मोदींनी हाफकिन इनस्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानगी कशी दिली, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही परवानगी मिळाल्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरू केले जाणार आहे. मात्र त्यापूर्वी राजकीय वर्तुळात श्रेयवादाची लढाई सुरू झाली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

राज ठाकरेंनीही मानले आभार

हाफकिन इन्स्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानगी मिळाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. 100 टक्के लसीकरणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हाफकिन सारख्या संस्थेला लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी, ह्या माझ्या विनंतीला आपण मान्यता दिलीत ह्याबद्दल पंतप्रधानांचे मनापासून आभार. केंद्र सरकारकडून असंच सहकार्य मिळत राहिल्यास एकत्रितपणे आपण ह्या संकटावर सहज मात करू, असे ट्वीट राज ठाकरेंनी केले आहे.

(हेही वाचाः आता मुंबईतही तयार होणार कोवॅक्सिन… या संस्थेला मिळाली मान्यता!)

राज ठाकरेंनीही पत्राद्वारे केली होती मागणी

राज्यात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या आणि लसीचा होत असलेला तुटवडा, यामुळे राज ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. यात त्यांनी राज्याला स्वतंत्रपणे लस खरेदी करू देण्याच्या मागणीसह पाच मागण्या केल्या होत्या. यात लसीचा पुरवठा वेळेत व्हावा म्हणून महाराष्ट्रातल्या इतर संस्थांना(उदा. हाफकिन व हिंदुस्थान अँटिबायोटिक) लस उत्पादन करण्यासाठी मुभा द्यावी, अशी मागणी केली होती. तसेच कोविड रोगाचा उपचार करण्यासाठी लागणारी आवश्यक औषधे (उदा. रेमडेसिवीर) ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा राज्यात असावा, म्हणून राज्याला आवश्यक पाऊले उचलण्यासाठी मोकळीक द्यावी, असे राज ठाकरेंनी नमूद केले होते.

मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधानांचे आभार

हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सिन बनवण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. आपल्या विनंतीचा स्वीकार करुन, केंद्र शासनाने ही परवानगी दिल्याने महारष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरू होऊ शकते, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

(हेही वाचाः ससून हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा संप: नुसत्या खाटा वाढवता, मनुष्यबळाचे काय? )

कोवॅक्सिन बनवण्यास 1 वर्षांचा कालावधी

विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी आज मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, यासंदर्भात वैज्ञानिक तज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार ही मान्यता देण्यात आली असून कोवॅक्सीन बनविण्यास 1 वर्षांचा कालावधी दिला आहे. सध्याचा वाढता संसर्ग आणि लसीकरणाची मागणी पाहता लवकरात लवकर हाफकिन बायो फार्मा कॉर्पोरेशन यांनी उत्पादन सुरु करावं, तसंच हाफकिन मध्ये यादृष्टीने लसीसंदर्भात आवश्यक त्या अनुभवी व प्रशिक्षित तंत्रज्ञांची नियुक्ती व्हावी. यासंदर्भात या प्रकल्पावर नियमित देखरेख करण्यासाठी व वेळेत उत्पादन पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यास देखील मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.