बीकेसीमध्ये ‘महायुती’चे शक्तिप्रदर्शन; मोदींना ऐकण्यासाठी लाखोंची गर्दी

भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना आणि रिपाइंच्या महायुतीने गुरुवारी वांद्रे-कुर्ला संकुल (बिकेसी) मैदानात शक्तिप्रदर्शन करीत मुंबई महापालिकेच्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी आयोजित केलेल्या सभेला लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऐकण्यासाठी ही विराट गर्दी जमली होती.

( हेही वाचा : दादर रेल्वे स्थानकात पाण्याचा अपव्यय!)

गुरुवारी सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुंबई विमानतळावर आगमन झाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. सायंकाळी पाच वाजता मोदी बिकेसीमध्ये सभास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांच्या स्वागताला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, पियुष गोयल, विधानसभा अध्यक्ष, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री रामदास आठवले, रावसाहेब दानवे, कपिल पाटील, डॉ. भागवत कराड, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर, मंगलप्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, मनोज कोटक, गोपाळ शेट्टी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार उपस्थित होते.

विविध विकासकामांचे लोकार्पण केल्यानंतर उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी मराठीत भाषणाची सुरुवात केली. ‘मुंबईतील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार’, असे उद्गार पंतप्रधानांच्या मुखातून ऐकताच उपस्थितांनी ‘मोदी… मोदी’, ‘कौन आया रे कौन आया… हिंदुस्थान का शेर आया’, अशा घोषणा दिल्या. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकांतही मोदींचा करिष्मा चालणार हे जवळपास स्पष्ट झाले.

मुंबईकरांना केले ‘हे’ आवाहन

मुंबईच्या विकासासाठी पैशांची कोणतीही कमतरता नाही. पण, मुंबईकरांच्या कष्टाचा पैसा योग्य कामासाठी वापरला गेला पाहिजे. याधीचे भाजपाचे सरकार असो किंवा एनडीएचे असो; विकासाच्या आड राजकारण आणि वैयक्तिक स्वार्थ आणले जात नव्हते. पण अलीकडे असे प्रकार होताना वारंवार अनुभवायला मिळाले आहेत. गरीब फेरीवाल्याना मदत व्हावी यासाठी आम्ही प्रधानमंत्री स्वनिधी योजना आणली. पण तत्कालीन राज्य सरकारने त्यात आडकाठी आणली. गरिबांच्या तोंडचा घास हिरावून घेतला. असे पुन्हा होऊ नये यासाठी मुंबईपासून दिल्लीपर्यंत आणि संपूर्ण देशभरात चांगले, ताळमेळ असलेले सरकार आवश्यक आहे. त्यामुळे या डबल इंजिन सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईकरांना केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here