- स्वप्नील सावरकर
जुन्या दासबोधातील समर्थांचा हा श्लोक आज खरंतर पंतप्रधान मोदींसह (PM Narendra Modi) तमाम हिंदुत्ववाद्यांसाठी आहे असं म्हटलं तर? कदाचित तुमच्यातील अनेकांना माझं म्हणणं आवडणार नाही. पण, हा श्लोक आज आठवण्याचं कारण ठरलंय ते काँग्रेसी युवराज राहुल गांधी यांची बाष्कळ बडबड!
या माणसाची, कुत्र्याच्या शेपटाप्रमाणे वादग्रस्त विधाने पुन्हा पुन्हा करण्याची सवय काही केल्या जात नाही. भाजपा, संघाचा विशेषतः मोदी आणि हिंदुत्वाचा विरोध आता इतक्या टोकाला पोहोचलाय की थेट इंडियन स्टेटलाच विरोध करण्यापर्यंत या बाबाची मजल गेली आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदींना (PM Narendra Modi) आपल्या काही संतपरंपरांची आठवण करून द्यावी म्हणून हा छोटासा प्रयत्न!
(हेही वाचा ‘भाषण ऐकताच घाबरून दुधाची बादली पडली’, बिहारमधील एका व्यक्तीने Rahul Gandhi यांच्या विरुद्ध दाखल केली तक्रार)
आता वरच्या श्लोकात समर्थ म्हणतात की, निंदक उगीच बाष्कळ बडबड करतात, नसत्या उठाठेवी करतात, असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ती निंदा अजिबात मनावर घेऊ नका. निंदकांच्या निंदेमुळे तुमच्या कार्यात विक्षेप येऊ देऊ नका. समर्थ पुढे सांगतात की, तुमचा तुमच्यावर विश्वास नाही. तुमची देहबुद्धी गेली नाही, मग इतरांना दोष देण्यात अर्थ नाही.
श्रीकृष्णाने भगवद्गीतेच्या १२ व्या अध्यायातील श्लोक क्र.१३ ते २० मध्ये आपल्याला प्रिय असलेल्या भक्तांची लक्षणे सांगितली आहेत. त्यातील एका श्लोकात म्हटले आहे की, ‘निंदा-स्तुती’ दोन्ही सारखीच मानणारा भक्त भगवंतास प्रिय असतो. तो श्लोकार्थ असा आहे-
तुल्य निन्दास्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचि्त।
याचा अर्थ निंदा व स्तुती दोन्ही समान मानणारा, वाणीचे संयमन करणारा मौनी मननशील आणि जे प्राप्त होईल, त्यात समाधान मानणारा भक्त परमात्म्याला आवडतो.
आता तुम्ही म्हणाल समर्थांवरून थेट श्रीकृष्णावर कुठे घसरताय? आता तर तुकोबारायांचाही अभंग आठवण करून द्यायचा आहे.
तुकारामांच्या निंदकाचे घर असावे शेजारी, या उक्तीचा दाखला वरच्या समर्थांच्या श्लोकाला अगदी विरोधी आहे, असे वाटेल. पण तुकोबांनी ही उक्ती सकारात्मकदृष्ट्या वापरली आहे, हे लक्षात घ्यायला हवं. पण त्याच तुकोबांनी,
मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास। कठीण वज्रास भेदूं ऐसे।
भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी।
असेही म्हटले आहे, हे लक्षात घ्या.
तुकोबांनी अगदी स्पष्टपणे सांगितले आहे की, वेळ पडली तर आम्ही स्वतःची लंगोटीही देऊ (इतके आम्ही उदार आहोत), पण कोणी एखादा आम्हाला फारच नेभळट समजून आमच्या लंगोटीलाच हात घालू पाहील, तर अशा नाठाळाचे टाळके सडकावयालाही आम्ही कमी करणार नाही!
मोदीसाहेब, (PM Narendra Modi) या तिन्ही परंपरांचा आदर्श तुम्ही ठेवाच. परंतु, आता राहुल गांधींसारख्यांना गीता, दासबोधापेक्षाही तुकोबांच्या काठीची गरज आहे, हे आम्हाला तुमच्या लक्षात आणून द्यायचे आहे, एवढंच !