I.N.D.I.A आघाडीने मोदी सरकारच्या विरोधात लोकसभेत अविश्वास ठराव मांडल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी I.N.D.I.A आघाडीवर हल्लाबोल केला. राजस्थानातल्या सीकर येथे बोलताना त्यांनी महात्मा गांधींच्या “क्विट इंडिया” अर्थात “छोडो इंडिया” आंदोलनाचा हवाला देत ‘भ्रष्टाचारी छोडो I.N.D.I.A, परिवार वाद छोडो I.N.D.I.A, तुष्टीकरण छोडो I.N.D.I.A’, असा नवा नारा देत हे नवे “क्विट इंडिया” आंदोलन देशाला वाचवेल, असे म्हटले आहे.
राजस्थानात विधानसभा निवडणुका आता अवघ्या 4 महिन्यांवर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे राजस्थान दौरे वाढले आहेत. आजच्या राजस्थान दौऱ्यात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे प्रोटोकॉल नाट्य रंगले होते. राजस्थानातील 12 मेडिकल कॉलेजच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी ते हजर नव्हते. मात्र त्यानंतर सीकरमध्ये झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस प्रणित I.N.D.I.A आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. त्यासाठी त्यांनी महात्मा गांधींच्या छोडो इंडिया अर्थात “क्विट इंडिया” आंदोलनाचा हवाला दिला. महात्मा गांधींनी 1942 मध्ये ‘अंग्रेजो इंडिया छोडो’ असा नारा दिला होता. त्या आंदोलनामुळे संपूर्ण देश पेटला होता आणि इंग्रजांना ‘इंडिया’ सोडून जाणे भाग पडले होते. आज तसाच नारा देण्याची वेळ आली आहे. कारण काँग्रेससह सगळे विरोधक स्वतःला I.N.D.I.A म्हणवून घेत आहेत. एकेकाळी याच अहंकारी काँग्रेसवाल्यांनी ‘इंदिरा इज इंडिया’ असा नारा दिला होता. पण त्या अहंकारी काँग्रेसला मतदारांनी हिसका दाखवून बाजूला केले होते. आज त्यांचेच वारस पुन्हा तेच पाप करत आहेत. ‘UPA इज I.N.D.I.A’ आणि ‘I.N.D.I.A इज UPA’, असे म्हणत आहेत.
(हेही वाचा Education : मायग्रेशन सर्टिफिकेट देणारी ऑनलाईन सुविधा बंद; हजारो विद्यार्थी चिंतेत)
Join Our WhatsApp Community