पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी कर्नाटक दौऱ्यावर

151

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 27 फेब्रुवारीला कर्नाटकच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी 11:45 च्या सुमारास मोदी शिवमोग्गा विमानतळाची पाहणी करून ते शिवमोग्गा इथल्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करतील. त्यानंतर दुपारी सुमारे सव्वातीन वाजता, बेळगावी इथे पंतप्रधान विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करतील. तसेच पीएम किसान योजनेच्या 13 हप्त्याची रक्कमही त्यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल.

( हेही वाचा : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ )

देशभरातील हवाई वाहतूक संपर्क व्यवस्था मजबूत करण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायमच भर दिला आहे, त्यांच्या या संकल्पाला अधिक बळ देणाऱ्या, शिवमोग्गा विमानतळाचे उद्घाटन यावेळी होणार आहे. सुमारे 450 कोटी रुपये खर्च करुन, हे नवे विमानतळ विकसित करण्यात आले आहे. या विमानतळावर, प्रवासी टर्मिनल इमारतीत दर तासाला, 300 प्रवाशांची व्यवस्था होऊ शकेल. या विमानतळामुळे शिवमोग्गा शहराची आणि मलनाड प्रदेशातील हवाई वाहतूक आणि संपर्कव्यवस्था अधिक सुधारण्यास मदत होईल.

पंतप्रधान शिवमोग्गा इथे दोन रेल्वे प्रकल्पांचे भूमिपूजनही करणार आहेत. यात शिवमोग्गा – शिकारीपुरा – राणेबेन्नूर नवीन रेल्वे मार्ग आणि कोटेगांगरु रेल्वे कोचिंग डेपोचा समावेश आहे. शिवमोग्गा – शिकारीपुरा – राणेबेन्नूर हा नवीन रेल्वे मार्ग 990 कोटी रुपये खर्चून विकसित केला जाईल. या प्रकल्पामुळे बेंगळुरू-मुंबई मार्गासह मलनाड प्रदेशात दळणवळण व्यवस्था अधिक सुलभ आणि गतिमान होईल. शिवमोग्गा शहरातच, कोटेगांगुरु रेल्वे कोचिंग डेपो विकसित केला जाणार आहे. 100 कोटींहून अधिक खर्च तयार होणाऱ्या या डेपोमुळे, शिवमोग्गा इथून नवीन गाड्या सुरू करता येतील तसेच बेंगळुरू आणि म्हैसूर इथे रेल्वेच्या देखभालीसाठी होणारी गर्दी कमी करता येईल.

पंतप्रधानांच्या हस्ते विविध रस्ते विकास प्रकल्पांची पायाभरणीही होणार आहे. एकूण 215 कोटींपेक्षा जास्त खर्चाच्या या प्रकल्पांमध्ये, राष्ट्रीय महामार्ग 766सी वर शिकारीपुरा टाउनसाठी, बयंदूर-रानीबेन्नूरला जोडणाऱ्या, नवीन बायपास म्हणजे वळणरस्त्याच्या समावेश आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग -169ए च्या मेगारावल्ली ते अगुंबे पट्ट्याचे रुंदीकरण; आणि राष्ट्रीय महामार्ग 169 वर तीर्थहल्ली तालुक्यातील भरतीपुरा येथे नवीन पुलाचे बांधकाम, अशा प्रकल्पांचा समावेश आहे.

याच कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान जल जीवन मिशन अंतर्गत 950 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या बहु-ग्राम योजनांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. यामध्ये गौतमपुरा आणि इतर 127 गावांसाठी एका बहु-ग्राम योजनेचे उद्घाटन आणि एकूण 860 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या तीन अन्य बहु-ग्राम योजनांसाठीचे भूमिपूजन केले जाईल. या चार योजना योजनांमुळे घरगुती पाइपद्वारे नळ जोडणी देता येईल. एकूण 4.4 लाखांहून अधिक लोकांना त्याचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.

पंतप्रधान, शिवमोग्गा शहरातील 44 स्मार्ट सिटी प्रकल्पांचेही उद्घाटन करतील. एकूण 895 कोटी रुपयांच्या या प्रकल्पांमध्ये,110 किमी लांबीचे आठ स्मार्ट रोड प्रकल्प, ज्यात, कमांड अँड कंट्रोल कक्ष तसेच बहुस्तरीय कार पार्किंग समाविष्ट असेल. तसेच स्मार्ट बस निवारा प्रकल्प, घनकचरा व्यवयथापन यंत्रणा, शिवाप्पा नाईक पॅलेससारख्या वारसा स्थळाचे संवादात्मक वस्तू संग्रहालयात रूपांतर केले जाणार आहे. त्याशिवाय,90 संवर्धन मार्ग, उद्यानांची निर्मिती आणि रिव्हरफ्रंट विकास प्रकल्प, यासह इतर प्रकल्पाचाही समावेश आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.