मुंबईच्या विकासाला डबल इंजिन सरकारमुळे गती – पंतप्रधान नरेंद्र मोदी

116

देशात एका बाजूला घर, शौचालय, वीज, पाणी, गॅस, मोफत आरोग्य, आयआयटी वाढत आहेत, तर दुसरीकडे आधुनिक कनेक्टीव्हीटीवरही जोर दिला जात आहे. देशातील आजची गरज आणि भविष्यातील गरज या दोन्ही आघाडींवर काम सुरु आहे. जगाची अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे, पण भारतात अजूनही ८० कोटी जनतेला मोफत धान्य देऊन त्यांची चूल विझू देत नाही. विकसित भारताच्या निर्मितीसाठी शहराची भूमिका महत्त्वाची आहे. त्यात येणाऱ्या २५ वर्षांत महाराष्ट्रातील अनेक शहरे देशाच्या विकासाला गती देणार आहेत. त्यासाठी मुंबईला तसे तयार करण्याचे प्राधान्य डबल इंजिन सरकारचे आहे. २०११ पर्यंत केवळ ११ किमी मेट्रो सुरु होती पण डबल इंजिन सरकार येताच मेट्रोचे काम आणखी जोरात सुरु आहे. ३०० किमी पर्यंत मेट्रोचे जाळे पसरत आहे, मुंबईच्या विकासाला डबल इंजिन सरकारमुळे गती मिळत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

मुंबईच्या विकासासाठीच्या ३८ हजार कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे शिलान्यास आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम गुरूवारी संपन्न झाला. बीकेसी येथे आयोजित या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते यांचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी पंतप्रधान मोदी बोलत होते.

(हेही वाचा मुंबईच्या विकासासाठीचा पैसा बँकेत पडून; पंतप्रधान मोदींचा घणाघात)

आधुनिक कनेक्टिव्हीटीमुळे मुंबईचा कायापालट होणार

डबल इंजिन सरकार सामान्य नागरिकांनाही आधुनिक सुविधा देत आहे, हे साधन संपन्न नागरिकांनाच मिळत होते, म्हणून रेल्वे स्थानकांचा विकास विमानतळासारखा होतो आहे. सीएसएमटी इथे लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी वेगवेगळ्या सुविधा दिल्या जाणार आहेत. शहरात मल्टी मॉडल कनेक्टिव्हीटी विकसित केली जात आहे. आधुनिक कनेक्टिव्हीटीमुळे मुंबईचा कायापालट होणार आहे. कोस्टल रोड, इंदू मिल स्मारक, ट्रान्स हार्बर लिंक हे सर्व प्रकल्प मुंबईला वेगळी ताकद देणार आहेत. धारावी पुनर्विकास प्रकल्प रुळावर आला आहे. मुंबईचे रस्ते सुधारण्याच्या कामाचे श्रेय डबल इंजिन सरकारला जाते. प्रदूषण आणि स्वच्छता याला प्राधान्य दिले जात आहे. बायो इंधन लवकर आणले जाणार आहे. शहरांच्या विकासासाठी देशाकडे सामर्थ्य आणि राजकीय इचछाशक्तीची कमतरता नाही. फेरीवाल्यांनी ५० हजार कोटींचे व्यवहार केले आहेत. हे फेरीवाले डिजिटल व्यवहार कसे करणार असे हिणवले जात होते, त्यांना हे मोठे उत्तर आहे. त्यांनी १० पावले पुढे चालावे मी अकरा पावले चालून पुढे येइन. जेवढे तुम्ही डिजिटल व्यवहार कराल, तेवढे तुम्हाला स्वनिधी अंतर्गत मिळालेल्या कर्जावर व्याज भरायची वेळ येणार नाही. तुमच्या उज्जवल भविष्याचे आश्वासन देण्यासाठी मी मुंबईत आलो आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.