सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात कट्टर दुश्मन कोण आहेत, असे विचारले तर कुणीही सांगेल, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस! त्याला कारणही तसे आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून शिवसेनेत भगदाड पाडले. तब्बल ४० आमदार फोडले. त्यामुळे शिवसेना आणि दोन्ही काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार कोसळले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडावी लागली. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस यांनी युती सरकार स्थापण केले. तेव्हापासून उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि शिवसेनेचे मुखपत्र सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत शिंदे गटाचे आमदार आणि या सरकारवर अश्लील शिवीगाळ करत आहेत. असे असूनही गुरुवार, १९ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी मुंबईतील विविध प्रकल्पाचे ते भूमिपूजन करणार आहेत. त्याच्या जाहिराती अग्रगण्य दैनिकात सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आल्या. मात्र अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले ते सामना दैनिकाने. या दैनिकाच्या पहिल्या पानावरही ही जाहिरात ठसठशीत प्रसिद्ध करण्यात आल्याचे दिसून आले.
शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थापनेपासून जाहिराती प्रसिद्ध
ज्या दैनिकाचे सारथ्य संजय राऊत करतात, त्या दैनिकात शिंदे-फडणवीस सरकारची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. ज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा उल्लेख असून त्यांचा फोटोदेखील रुबाबदारपणे दिसत आहे. दैनिकातील जाहिराती हा व्यवसायाचा भाग आहे, हा मुद्दा काही वेळापुरता मान्य करायचा झाला, तरी ज्या सरकारच्या निर्मितीमुळे शिवसेनेचे होत्याचे नव्हते झाले, त्या सरकारची जाहिरात प्रसिद्ध करण्याचे धोरण संजय राऊत यांनी स्वीकारलेच कसे, असा प्रश्न आता विचारला जात आहे. शिंदे-फडणवीस सरकारची जाहिरात सामनामध्ये प्रसिद्ध करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम झाला, त्याचीही जाहिरात सामनामध्ये प्रसिद्ध झाली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मुंबईचा कायापालट करणाऱ्या मुंबई सुशोभीकरण प्रकल्पाची घोषणा करणारी जाहिरातही सामनामध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. तसेच शिंदे-फडणवीस सरकारच्या मराठी भाषा विभागाची विश्व मराठी संमेलन २०२३ ची जाहिरातही सामनामध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती.
(हेही वाचा भारतीय कुस्तीतही #MeToo; ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात महिला कुस्तीपटू उतरल्या ‘मैदानात’)
Join Our WhatsApp Community