राष्ट्रवादीचे नेते, मंत्री नवाब मलिक यांच्यावर कुर्ला येथील क्रिटीकेअर या खासगी रुग्णालयात उपचार करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे नवाब मलिक हे घराच्या जवळ आले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये तुरुंगात असल्यामुळे नवाब मलिक यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. मलिक यांना उपचारांबरोबरच पोलीस बंदोबस्तासाठी येणारा खर्च मलिक कुटुंबाला उचलावा लागणार आहे. मलिक यांच्यासोबत एकाच कुटुंब सदस्याला राहण्याची मुभा न्यायालयाने दिली आहे.
२३ फेब्रुवारी रोजी अटक केली
सध्या नवाब मलिक हे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम यांची बहीण हसीना पारकर हिच्याकडून जमीन खरेदी केल्याच्या आरोपाखाली अटकेत आहेत. मनी लॉंडरिंगच्या आरोपाच्या खाली नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता नवाब मलिक यांना किडनीसंबंधी आजार जडले आहेत. हे आजार वाढत आहेत, त्यामुले त्यांच्यावर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयात परवानगी देण्यात यावी अशी मागणी मलिक यांनी न्यायालयात केली. न्यायालयाने त्यांना परवानगी दिली. त्यामुळे आता मलिक यांना कुर्ला येथील क्रिटीकेअर या खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. सुरुवातीला ते पोलीस कोठडीत होते. त्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. तेव्हापासून नवाब मलिक यांच्या शारीरिक व्याधी उफाळून आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांची प्रकृती खूपच खालावल्याने त्यांना स्ट्रेचरवरून जे.जे. रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली होती. त्यांना काही काळ अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते.
Join Our WhatsApp Community