वारकरी बांधवांचे पायी वारी आंदोलन! बंडातात्या कराडकरांना पोलिसांनी घेतले ताब्यात!

सरकारचा हा आदेश झुगारून ह.भ.प. बंडातात्या कराडकर शुक्रवारी आळंदीत दाखल झाले आणि शनिवारी सकाळपासून पायी वारीला सुरुवात केली होती.

२०२० साली कोरोनामुळे आषाढीच्या पायी वारीला परवानगी नाकारण्यात आली होती. आता २०२१ सालीही पायी वारीला परवानगी नाकारण्यात आली. एका बाजूला राजकीय पक्षांच्या सभा, मोर्च, आंदोलने होतात, पण वारीला नकार दिला जात आहे. त्यामुळे यंदा वारकरी बांधवांनी मात्र आक्रमक भूमिका घेतली आहे. ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी सविनय कायदेभंग आंदोलन करत पायी वारी करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे आळंदी येथून पंढरपूरकडे निघालेले  ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना अखेर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्यांना नरजकैद केले आहे. तसेच, पोलिसांसोबत ह.भ.प. बंडातात्या गाडीमधून पंढरपुरच्या दिशेने रवाना झाले.

ह.भ.प. कराडकर यांच्या समर्थनार्थ वारकऱ्यांचे आंदोलन! 

शनिवारी सकाळीच ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना दिघीजवळील संकल्प गार्डन मंगल कार्यालयात ठेवण्यात आले. त्यावेळी ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्या समर्थनार्थ संकल्प गार्डन बाहेर वारकरी बांधव जमायला लागले. त्यावेळी स्थानिक आमदार महेश लांडगे हेदेखील त्यांच्या भेटीसाठी दाखल झाले. पुढे ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना मठात नेण्यात आले. मात्र तिथेही समर्थक ठिय्या देऊन बसले. भजन गाऊ लागले. दरम्यान, आमदार महेश लांडगे यांनी ह.भ.प. बंडातात्या आणि वारकऱ्यांमध्ये मध्यस्थीची भूमिका केली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आपण प्रशासनाला सहकार्य करण्याची भावना ठेवली पाहिजे. पालखी सोहळ्याला गालबोट लागणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, अशी भूमिका मांडली. दोन तास झालेल्या चर्चेनंतर अखेर ह.भ.प. बंडातात्या यांनी गाडीतून पंढरपूरला जाण्यास होकार दर्शवला. मात्र, माझ्यासोबत असलेल्या वारकऱ्यांना पायी पंढरपूरला जाण्याची परवानी द्यावी, अशी मागणी केली. पालखी सोहळ्यात वारकरी आळंदी-पंढरपूर चालत येणारच, असा एल्गार ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी केला होता. याआधी संत तुकाराम महाराज यांच्या बीज सोहळ्यासाठी सर्व वारकऱ्यांना परवानगी द्यावी, या मागणीसाठी ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी देहूच्या वेशीवर भजन सत्याग्रह आंदोलनदेखील केले होते.

(हेही वाचा : आता स्वत:च्याच मंत्र्यांवर शिवसेना आमदार नाराज!)

शुक्रवारीच ह.भ.प. कराडकर आळंदीत दाखल!  

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा राज्य सरकारने आषाढी वारी सोहळ्यावर निर्बंध घातले आहेत. केवळ मानाच्या१० पालख्यांना पंढरपूरमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. वाखरीपासून दीड किलोमीटर अंतरापर्यंत प्रतिकात्मक पायी वारी काढली जाणार आहे. मात्र, सरकारचा हा आदेश झुगारून ह.भ.प. बंडातात्या कराडकर शुक्रवारी आळंदीत दाखल झाले होते. याठिकाणहून त्यांनी पायी वारीला सुरुवात केली होती. सर्व वारकऱ्यांनी आळंदी येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती.

२३ वारकरी कोरोनाबाधित! 

राज्य सरकारने परवानगी दिलेल्या पालखी प्रस्थान सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांची ‘आरटीपीसीआर’ चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये २३ जण करोनाबाधित असल्याचे अहवाल प्राप्त झाले. संबंधितांवर म्हाळुंगेतील कोरोना सेंटर येथे उपचार सुरू आहे. मात्र यामुळे खळबळ उडाली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here