विवियाना मॉलमधील राड्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांना पोलिसांकडून अटक

136

हर हर महादेव या चित्रपटावरुन झालेल्या वादाला आता मोठे वळण लाभले आहे. ठाण्याच्या विवियाना मॉलमधील चित्रपट गृहात सोमवारी रात्री शिरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला होता. त्यानंतर आता पोलिसांनी याबाबत मोठी कारवाई केली असून, जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी घेतले ताब्यात

ठाण्यातील वर्तक नगर पोलिसांनी याप्रकरणी आव्हाड यांना अटक केली आहे. हर हर महादेव या सिनेमाचा रात्रीचा शो जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी बंद पाडला होता. यावेळी आव्हाडांच्या कार्यकर्त्यांकडून चित्रपटगृहातील प्रेक्षकांना मारहाण झाल्याचे देखील सांगण्यात येत होते. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून जितेंद्र आव्हाड यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जामीन मागणार नाही- आव्हाड

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी याबाबतची माहिती दिली असून आपण या अटकेचे स्वागत करत आहोत. तसेच जामीनासाठी कोणताही प्रयत्न करणार नसल्याचेही आव्हाड यांनी स्पष्ट केले आहे. आपल्या विरोधात कट रचण्यासाठी अधिकची कलमे घालून आपल्याला अटक करण्यात येत असल्याचा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केला आहे.

आव्हाडांवर गुन्हा दाखल 

विवियाना मॉलमधील राड्याप्रकरणी आव्हाड यांच्या 100 कार्यकर्त्यांवर मंगळवारी गुन्हा दाखल झाला होता. वर्तकनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. कलम 141,143, 146,149,323,504, मुंबई पोलिस कायदा कलम 37/135 या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी परिक्षित विजय धुर्वे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.