छत्रपती संभाजी महाराजांबद्दल चुकीचे व बदनामीकारक माहिती प्रकरणी “Renaissance State:The Unwritten Story of the Making of Maharashtra” या ग्रंथाचे लेखक पत्रकार गिरीश कुबेर यांच्या विरोधात वारजे पोलिस स्टेशन(पुणे शहर पोलिस) येथे राजे शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष व भाजपा युवा मोर्चा पुणे शहर उपाध्यक्ष महेश पवळे यांनी २६ मे, २०२१ तक्रार अर्ज दाखल केला आहे.
पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी
पत्रकार गिरीश कुबेर लिखित “Renaissance State: The Unwritten Story of the Making of Maharashtra” या पुस्तकाचे पान क्रमांक ७६ सोशल मीडियावर प्रसारित झाले आहे. यामध्ये त्यांनी संभाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती दिल्याचे समोर आले आहे. जसे की संभाजी राजांनी सोयराबाई राणीसाहेब यांना ठार मारले. मात्र संभाजी महाराजांनी महाराणी सोयराबाई यांना ठार मारल्याचा कोणताही समकालीन पुरावा उपलब्ध नाही. तसेच संभाजी महाराजांचा राज्य कारभाराविषयी ही चुकीची निराधार माहिती या ग्रंथात दिली आहे. समाजात छत्रपती संभाजी महाराजांचे अत्यंत आदराचे स्थान आहे आणि म्हणून त्यांची बदनामी होईल, अशी चुकीची माहिती समोर आल्याने समाजात असंतोष निर्माण झाला आहे. अनेक मान्यवरांनी गिरीश कुबेर यांचा निषेध करुन, त्यांच्या “Renaissance State: The Unwritten Story of the Making of Maharashtra” पुस्तकावर बंदी घालण्याची रास्त मागणी केली आहे.
(हेही वाचाः गिरीश कुबेरांच्या पुस्तकात संभाजी महाराजांचा अपमान! खासदार संभाजी राजेंनी केली कारवाईची मागणी)
गुन्हा दाखल करण्याची मागणी
नामवंत इतिहासकारांनी खोटी माहिती खोडून काढत संभाजी महाराजांचा सत्य जाज्वल्य इतिहास जगासमोर आणला हे सर्वश्रुत आहे. मग संभाजी महाराजांबद्दल अस्सल ऐतिहासिक संदर्भ उपलब्ध असताना, गिरीश कुबेर यांनी खोटी माहिती आपल्या ग्रंथात समाविष्ट का केली, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. महापुरुषांविषयी खोटी माहिती देणे समाजात असंतोष निर्माण करू शकते, हे एका ज्येष्ठ पत्रकाराला का समजू नये? की त्यांनी हे जाणीवपूर्वक केले आहे? याबाबत सखोल तपास करण्यासाठी लेखक गिरीश कुबेर व पुस्तकाचे प्रकाशक यांच्यावर गुन्हा दाखल करुन, कायदेशीर कारवाई होणे समाजहिताचे आहे, असे महेश पवळे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
यावेळी पवळे यांच्यासोबत राजे शिवराय प्रतिष्ठान चे कार्यकर्ते रणजित टेमघरे, अमित जाधव, लक्ष्मीकांत मोरे उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community