राज्यभरात शिवसैनिकांना पोलिसांकडून नोटीस

137

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच राज्यात शांतता कायम रहावी, यासाठी राज्यभरातील शिवसैनिकांना पोलिसांकडून नोटीस पाठविण्यात येत आहे. शिवसैनिक तसेच नाराज आमदार यांच्या समर्थकांना देखील नोटीस पाठविण्यात येत असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिली आहे.

पोलिसांना सतर्कतेचा इशारा

राज्यात राजकीय घडामोडीला वेग आला आहे, कुठल्याही क्षणी सरकार बदलू शकते. या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरातील पोलिसांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत पोलिसांची अधिक कुमक मागविण्यात आलेली असून त्यात राज्य राखीव दलाच्या १० तुकड्या, तसेच ७५० जणांचा अधिक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबईत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच शांतता राखण्यात यावी यासाठी पोलिसांनी शिवसैनिक तसेच नाराज आमदारांचे समर्थक यांना कलम १४९ अनव्ये नोटीस पाठवल्या जात आहेत.

(हेही वाचा सत्ता गेल्यावर शिवसैनिक आठवले, महाराष्ट्राचे डोळे पाणावले! भाजपाचा टोला )

काय म्हटले आहे नोटीसमध्ये?

“मुंबई शहरामध्ये कायदा व सुव्यस्था निर्माण होऊ नये म्हणून संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. ज्या आमदारांनी बंड केले आहे, त्यांचा निषेध करण्यासाठी आपण कोणतेही आक्षेपार्ह फोटो, बॅनर लावू नये अथवा ध्वनी प्रेक्षणाद्वारे त्यांच्या कार्यालया पुढे निदर्शने करू नये, तसेच सोशल मीडियावरून कोणत्याही प्रकारे आक्षेपार्ह संदेश प्रसारित करू नये आणि आपल्या पक्षाचे कार्यकर्ते यांना एकत्र जमवू नये, बंडखोर आमदारांचे फोटो व पुतळे यांना काळे फासणे तसेच आमदार व त्यांच्या नातेवाईकांना धमकावू नये असे शिवसैनिक आणि बंडखोर आमदार समर्थक यांना देण्यात आलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.

मुंबईत पोलीस बंदोबस्त

बंडखोरी करून दुसऱ्या राज्यात गेलेले शिवसेनेचे आमदार हे गुरुवारी मुंबईत दाखल होणार आहेत, या दरम्यान संतप्त शिवसैनिक रस्त्यावर उतरण्याची शक्यता नाकारता येणार नसल्यामुळे मुंबईत पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला असून अधिक पोलीस कुमक मागविण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त दर्जाचे २० अधिकारी, सहायक पोलिस आयुक्त ४५, पोलीस निरीक्षक २२५, सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक ७२५, पोलीस अंमलदार (पुरुष) २५००, महिला अंमलदार १२५०, राज्य राखीव दलाच्या १० तुकड्या आणि अतिरिक्त पोलिस दल ७५० यामध्ये वाढ होण्याची शक्यता पोलीस उपायुक्त (अभियान) यांनी वर्तवली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.