RSS कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

आरोपी महापारेषण कंपनीत अभियंतापदावर कार्यरत

155

नागपुरातील रेशीमबाग परिसरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय आणि त्याशेजारी असलेले सुरेश भट सभागृह बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांना ताब्यात घेतले आहे. हा आरोपी महापारेषणमध्ये अभियंता पदावर कार्यरत असून स्थानिक सक्करदरा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान आपली मानसिक स्थिती खराब असल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले आहे.

काय घडला प्रकार

नागपुरातील सुरेश भट सभागृहात 25 नोव्हेंबर रोजी वीज कर्मचाऱ्यांचा एक मेळावा झाला. त्याच दिवशी सक्करदरा पोलिसांना सुरेश भट सभागृह बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारे एक निनावी पत्र मिळाले. हे पत्र पाहून पोलिसांच्या पायाखालची वाळू सरकली. कारण सुरेश भट सभागृहाला लागूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय आहे. सध्या मुख्यालयात तृतीय वर्ग संघ शिक्षा वर्ग असल्याने संघाचे मोठे पदाधिकारीही आलेले आहे. पत्र मिळताच पोलिसांनी गोपनीयता बाळगत तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता महापारेषणचा अभियंता आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता मानसिक स्थिती खराब असल्याने असे केल्याची कबुली दिली.

(हेही वाचा – ‘ठाकरेंना आपल्याच घरातील महिलेला मुख्यमंत्री करायचे आहे’, नवनीत राणांची टीका)

यापूर्वी 7 जानेवारी 2022 रोजी रा. स्व. संघाच्या मुख्यालयासह इतर संवेदनशील ठिकाणांची जैश-ए-मुहम्मद या दहशतवादी संघटनेकडून रेकी झाल्याचा प्रकार घडला होता. नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयासह रिझर्व्ह बँकेसारख्या महत्वाच्या ठिकाणांची जैश-ए-मुहम्मद या दहशतवादी संघटनेकडून रेकी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह संघ तसेच भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचा वावर असतो. यापूर्वीही संघ मुख्यालयावर दहशतवादी हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न झाला होता. संघ मुख्यालयाचा अतिशय संवेदनशील वास्तूंमध्ये समावेश होतो. पोलिसांनी या सर्व भागातला बंदोबस्त वाढवला आहे. पोलिस डोळ्यात तेल घालून या भागातल्या हालचालींवर नजर ठेऊन असतात.

फोटोग्राफी/व्हिडिओग्राफीला बंदी

दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, महाल, नागपूर येथील सभोवतालच्या परिसरात फोटोग्राफी/व्हिडिओग्राफी तसेच ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यास नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाने बंदी घातली आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी दक्षता घ्यावी व आदेशाचे पालन करावे असे आवाहन आयुक्तालयाने केले आहे. या पूर्वी 1 जून 2006 रोजी संघ मुख्यालयावर दहशतवादी हल्ला झाला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.