काय म्हटले आहे नोटिशीत?
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आझाद मैदानाचे ७००० स्क्वेअर मीटर एवढेच क्षेत्र आंदोलनासाठी राखीव ठेवण्यात आलेले असून त्याची क्षमता ५००० ते ६००० आंदोलकांना सामावूर घेण्याएवढीच आहे, परंतु तेथे प्रचंड मोठ्या संख्येने आंदोलक आल्यास त्यांना थांबण्यासाठी मैदानावर पर्याप्त जागा उपलब्ध होणार नाही व त्याप्रमाणात सोयीसुविधा देखील तेथे नाहीत. तसेच उर्वरित मैदान कीडा विभागाच्या अख्यत्यारित असून शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे पत्र कमांक मैदान ३०२४/प्र.क. १२/२०२४/कीयुसे-१, २४.०१.२०२४ अन्वये तेथे आंदोलनासाठी परवानगी देण्यात आलेली नाही.
छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे एखादे आंदोलन / कार्यक्रम करण्याकरता उच्च न्यायालय ४ जानेवारी २०१३ च्या आदेशातील तरतूदीस अनुसरून शासन निर्णय क्रमांक बीएमसी-२५१ क्र.१२७०/नवि-२१, २० जानेवारी २०१६ अन्वये आयुक्त, मुंबई महानगरपालिकाची परवानगी घेणे आवश्यक आहे. या ठिकाणी विना परवानगी आंदोलन / कार्यक्रम केल्यास तो न्यायालयाचा अवमान होईल. तसेच २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन असल्याने छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे ध्वजारोहन व संचलनाचा शासकीय कार्यक्रम पूर्व नियोजित असून आपल्या आंदोलनामुळे सदर कार्यक्रमास अडथळा होण्याची शक्यता आहे. तसेच एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येने येणाऱ्या आंदोलकांना सामावून घेण्याची क्षमता छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाची नाही.
आपण लाखोच्या संख्येने आंदोलक व वाहनांसह मुंबईत येणार असल्याचे घोषित केले आहे, त्यामुळे मुंबईतील दैनंदिन जनजीवन विस्कळीत होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. तसेच मुंबईची भौगोलिक स्थिती, लोकसंख्या, वाहनांची संख्या, अरुंद रस्ते, उपलब्ध नसलेले पर्यायी रस्ते, खोळंबणारी वैद्यकीय सोयीसुविधा, त्यामुळे होणारी रुग्णांची हेळसांड व इतर अत्यावश्यक सेवांवर होणारा प्रभाव पाहता मुंबईतील एकूण सार्वजनिक सुव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार आहे. त्याचप्रमाणे आपण वेळोवेळी सांगितल्याप्रमाणे हे आंदोलन प्रचंड संख्येचे असून मुंबईमधील कोणत्याही मैदानामध्ये एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येच्या आंदोलकांना सामावून घेण्याची क्षमता नाही. त्याचप्रमाणे सदरचे आंदोलन हे अनिश्चित कालीन असल्याने त्यासाठी आवश्यक सोयी सुविधा दीर्घकाळासाठी मुंबईमध्ये पुरविणे शक्य होणार नाही व त्याचा परिणाम सार्वजनिक आरोग्य व इतर नागरी सुविधांवर होणार आहे.
उच्च न्यायालयाने तुमच्या आंदोलनासाठी योग्य जागा कळविण्याबाबत निर्देश दिलेले आहेत, त्याअर्थी आपणास शांततामय मार्गाने आंदोलन करण्यासाठी इंटरनॅशनल कॉपरिशन पार्क मैदान, सेंटर पार्क जवळ, सेक्टर २९, खारघर, नवी मुंबई हेच मैदान संयुक्तिक राहील. तरी या ठिकाणी आंदोलन करण्याकरिता आपण संबंधित प्राधिकरणाकडे अर्ज करुन रितसर परवानगी घ्यावी.
Join Our WhatsApp Community