आता राज ठाकरेंचे पत्रक वाटणाऱ्या मनसैनिकांची धरपकड

123

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विषयावर पत्रक काढले आहे. हे पत्रक मनसैनिक घरोघरी जाऊन वितरित करत आहेत. भोंग्यांचा विषय कायमचा संपवावा, असे आवाहन या पत्रकातून करण्यात आले आहे. आता हे पत्रक वाटणाऱ्याही मनसैनिकांची पोलीस धरपकड करू लागले आहेत. त्यामुळे आधीच मशिदींसमोर भोंगे लावून हनुमान चालीसा लावताना पोलिसांनी मनसैनिकांना ताब्यात घेतले होते, आता भोंग्यांच्या विरोधात काढलेले पत्रक वाटताना पोलीस मनसैनिकांची धरपकड करत आहेत.

भोंग्याच्या आंदोलनाला विरोध आता  राज ठाकरेंच्या पत्रकालाही विरोध 

राज ठाकरे यांचे हे पत्रक त्यांच्या हस्ताक्षरातील आहे. मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत हे पत्रक छापले आहे. हे पत्रक मनसैनिक घराघरात पोहचवत आहेत. व्यापक लोकसहभागाशिवाय आपले हे आंदोलन यशस्वी होणार नाही. मला खात्री आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पत्र पोहोचवण्याच्या कामात तुमच्याकडून जराही कुचराई होणार नाही, असे राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मुंबईतील महाराष्ट्र सैनिकांनी ते पत्रक घराघरात वाटण्याची तयारी केली. मात्र हे पत्रक वाटणाऱ्या मनसैनिकांची पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. घाटकोपरच्या असल्फा विभागात मनसे उपाध्यक्ष महेंद्र भानुशाली यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी प्रथम या पत्राचे महेश्वर मंदिरात पूजन केले. त्यानंतर हे पत्र घरोघरी वाटप करण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. चेंबूर येथेही मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरसीएफ पोलीस स्थानकात मनसे कार्यकर्त्यांना बसवून ठेवण्यात आले आहे. विना परवाना पत्रक वाटत असल्याने पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मनसे कार्यकर्त्यांनी दिली.दादर विभागात मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी माहीम येथील मकरंद सोसायटीमधील रहिवाश्यांना या पत्रांचे वाटप करत मनसेची भूमिका सांगितली. तसेच पोलिसांनी कितीही जणांना अटक केली तरी मनसैनिक पोस्टमन बनून राज ठाकरे यांचे हे पत्र घराघरात पोहोचवतीलच असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.