मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद आणि पुणे येथील सभेला अनुक्रमे १६ आणि १२ अटी लावल्या होत्या, या दोन्ही सभांच्या अटींमध्ये धर्माधर्मात तेढ होईल अथवा कुणाचा अवमान होईल, असे विषय भाषणात मांडू नये, असे म्हटले होते. त्याप्रमाणे ८ जून राय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा होणार आहे. त्याही सभेला १५ अटी लावण्यात आल्या आहेत, परंतु त्यामध्ये धर्माधर्मात तेढ होईल अथवा कुणाचा अवमान होईल, अशी अट घालण्यात आली नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेला कालपर्यंत परवानगी मिळाली नव्हती. मात्र शनिवार, ४ जून २०२२ रोजी सभेला परवानगी मिळाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या सभेला पोलिसांनी 15 अटीशर्तींसह परवागनी दिली आहे. मराठवाड्यातील शिवसेनेची पहिला शाखा औरंगाबादेत 8 जून 1985 रोजी स्थापन झाली. या शाखेच्या 37 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या मैदानात राज ठाकरे यांची सभा झाली होती, त्याच शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. यासाठी गेल्या महिन्याभरापासून शिवसेनेकडून तयारी सुरु आहे. या सभेचा टीझरही प्रसिद्ध केला आहे.
(हेही वाचा दहाव्या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त होणार हिंदु राष्ट्राचा उद्घोष!)
- जाहीर सभा ठरलेल्या वेळेतच आयोजित करावी. कार्यक्रमाचे ठिकाण व वेळेत कोणत्याही प्रकारचा बदल करु नये.
- कार्यक्रमाचे वेळी कोणत्याही प्रकारे कोणताही रस्ता रहदारीस बंद करण्यात येवू नये अथवा वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.
- सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. सभेला येतांना व परत जातांना कोणीही घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करणार नाही याची दक्षता घ्यावी.
- सभेसाठी येतांना अथवा परत जातांना कोणत्याही प्रकारे मोटारसायकल, कार रॅली काढू नये.
- कार्यक्रमा दरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, इत्यादी बाळगू नये अथवा प्रदर्शन करु नये. तसेच शस्त्र अधिनियमातील तरतुदीचा भंग करु नये.
- सभा स्थानाच्या कमाल मर्यादेपेक्षा जास्त लोकांना निमंत्रित करु नये. अशा प्रकारे क्षमतेपेक्षा अधिक लोकांना निमंत्रित करून काही ढकला ढकली, अव्यवस्था, गोधळ, चेंगराचेंगरी निर्माण झाल्यास संयोजकांना जबाबदार धरले जाईल.
- सभेसाठी वापरण्यात येणाऱ्या ध्वनिक्षेपकाबाबत मा. सर्वोच्च न्यायालय निर्देश व ध्वनिप्रदुण (नियंत्रण व नियमन ) प्रमाणे आवजाची मर्यादा असावी
- कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून आयोजकांमार्फत कायदा व सुव्यस्थेस कोणत्याही प्रकारे बाधा येणार नाही याची जबाबदारी संबंधित आयोजकांची राहील, यासह एकूण 15 अटीशर्तींसह सभेला परवागनी देण्यात आली आहे.