सन १९६०-७० दशकापासून जिथे अन्याय झाल्यास पोलीस स्टेशनऐवजी थेट शिवसेना शाखांमध्ये धाव घेतली जात होती. पोलीस ठाण्यांपेक्षा जनतेला शिवसेनेच्या शाखांवरच जास्त विश्वास होता. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अन्यायाविरोधात दाद मागायची अशाप्रकारच्या शिवसेना शाखांची ओळख होती. परंतु ज्या शाखांमधून न्याय दिला जात होता आणि पोलीस ठाण्यांकडे जनता पाठ फिरवायची आता त्याच शाखांना पोलिसांचे संरक्षण देण्याची वेळ आली आहे. खरी शिवसेना कुणाची यावरून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुरू असलेल्या सुनावणीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनाच खरी शिवसेना असून पक्षाचे चिन्हही त्यांच्याच शिवसेनेकडे राहिल, असा निकाल निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर मुंबईतील प्रत्येक शाखांना विशेष पोलीस संरक्षण दिल्याचे पहायला मिळत आहे.
शिवसैनिकांमध्ये हाणामारीला सुरुवात
खरी शिवसेना कुणाची यावरून उध्दव ठाकरे यांची शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना यांच्या न्यायालयीन लढा सुरू आहे. ही न्यायालयीन लढाई अंतिम टप्प्यात असतानाच शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने खरी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच असून त्यांच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण चिन्ह राहिल अशाप्रकारचा निकाल दिला. या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना आणि उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सैनिकांमध्ये शाखा ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात हाणामारी होण्यास सुरुवात झाली आहे.
शिवसेना शाखांवर आता कब्जा?
केंद्रीय निवडणूक आयोगाने उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेऐवजी खरी शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला मान्यता व धनुष्यबाण चिन्ह दिल्यानंतर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी हे आपोआपच एकनाथ शिंदे यांच्या खऱ्या शिवसेनेत विलीन झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील सुमारे २२७ प्रभागांमधील शिवसेना शाखांवर आता कब्जा होण्याची शक्यता लक्षात घेता स्थानिक पोलिसांचा ताफा शिवसेना शाखांभोवती वाढवण्यात आला आहे. त्यामुळे एकप्रकारे शिवसेनेच्या शाखा या पोलिसांच्या बंदोबस्तात असून एकेकाळी जिथे शिवसेना शाखा या गोरगरीब अन्यायग्रस्त जनतेला आधार वाटायच्या आणि आज त्याच शाखा पोलीस संरक्षणात पहायला मिळत आहे.
(हेही वाचा – निवडणूक आयुक्त पंतप्रधानांचे गुलाम; उद्धव ठाकरेंची टीका)
शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, अनेक शाखा या अनधिकृत असून शिवसेनेच्या नावावरच आहेत. त्यामुळे व्यक्ती म्हणून त्या कुणाच्या नावावर नसल्याने खरी शिवसेना म्हणून शिंदे यांच्या शिवसेनेला मान्यता मिळाल्याने आपोआपच या शाखांवर त्यांचा अधिकार होतो, तिथे विरोध होण्याची शक्यता असली तरी वस्तूस्थिती नाकारता येत नाही. त्यामुळे प्रत्येक शाखा या शिवसेनेचाच असल्याने त्या शाखांमध्ये बसणारे पदाधिकारी उध्दव ठाकरे यांच्यासमवेत राहण्यास तयार असतील तर त्यांना या शाखांचा ताबा सोडावाच लागेल आणि नवीन पक्षाचे नवीन कार्यालय खुले करावे लागेल. त्यामुळे भविष्यात या शाखा ताब्यात घेण्यावरून होणारी राडेबाजी पाहता कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पोलिसांनी संरक्षण दिले असले तरी शिवसैनिक म्हणून याचा सामना करण्यास प्रत्येक सैनिक तयार असल्याचे बोलले जात आहे.
Join Our WhatsApp Community