पोलिसांचे राज ठाकरेंना दोन पर्याय

127

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी केली. त्यानंतर आता राज ठाकरे यांच्या ठाण्यातील सभेकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे यांच्या या सभेसाठी पोलिसांनी मनसेने ठरवलेल्या जागेऐवजी शहरांतील इतर दोन जागांचे पर्याय सुचवले आहेत. मात्र हे पर्याय मनसेच्या नेत्यांना मान्य नसल्याचे समजत आहे. आम्ही ठरवलेल्याच जागी राज ठाकरे यांची सभा होणार, असा स्पष्ट इशारा मनसैनिकांनी दिला आहे.

(हेही वाचाः वातावरण चिघळणार? राज ठाकरेंच्या नावाला फासलं काळं!)

का दिले पर्याय?

ठाणे येथे 9 एप्रिल रोजी राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. गडकरी रंगायतन नाट्यगृहाजवळ असलेल्या मुस चौकात या सभेला परवानगी देण्यात यावी, असा अर्ज मनसेकडून पोलिसांना देण्यात आला आहे. परंतु या जागी सभा घेण्यास पोलिसांनी नापसंती दर्शवली आहे. गडकरी रंगायतन येथे एका काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, त्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पोलिसांना तेथे सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवावी लागणार आहे. तसेच मुस चौकात रहदारी जास्त असल्यामुळे तेथील रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी मुस चौकाऐवजी शहरातील इतर दोन ठिकाणांचे पर्याय मनसेला सुचवले आहेत.

हे आहेत दोन पर्याय

एकाच वेळी दोन कार्यक्रमांना सुरक्षा देताना सुरक्षा व्यवस्थेवर ताण येतो. त्यामुळे पोलिसांनी राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारली नसली, तरी त्यांना जागा बदलण्याचा पर्याय सुचवला आहे. ठाण्यातील हायलँड मैदान आणि काशिनाथ घाणेकर नाट्यगृह असे दोन पर्याय पोलिसांकडून सुचवण्यात आले आहेत. पण या हे दोन्ही पर्याय मनसैनिकांना मान्य नसल्याचे मनसेकडून सांगण्यात येत आहे.

(हेही वाचाः राज्यसभेतही राऊतांची बोलती केली बंद)

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मनसेची सभा

मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी राज ठाकरे यांची सभा मनसेने ठरवलेल्या जागीच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पोलिसांनी परवानगी दिली नाही तरी आम्ही मुस चौकातच सभा घेऊ, असे जाधव यांनी सांगितले आहे. त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात राज ठाकरे यांची सभा मनसेने ठरवलेल्या जागीच होणार का, हे पाहणे आता महत्वाचे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.