MNS च्या बॅनरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोमुळे राजकीय वाद

117
MNS च्या बॅनरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोमुळे राजकीय वाद
  • प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) गुढीपाडवा मेळावा रविवारी (३० मार्च) छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर होणार असून, या मेळाव्याच्या जाहिरातीसाठी लावलेल्या बॅनरवरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. मनसेच्या एका कार्यकर्त्याने दादर येथे लावलेल्या बॅनरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावल्यानंतर हा मुद्दा चर्चेत आला.

या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, “आता सगळ्यांनाच बाळासाहेबांचा फोटो लावण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.”

मनसेच्या बॅनरवरील बाळासाहेबांचा फोटो – नव्या चर्चेला सुरुवात

दादर येथे लावण्यात आलेल्या बॅनरवर प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे फोटो झळकत होते. या चार पिढ्यांचे प्रतिनिधित्व करणारे फोटो बॅनरवर झळकवल्याने चर्चेला उधाण आले.

मनसे (MNS) स्थापन झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो सुरुवातीला बॅनरवर दिसत असे. मात्र, स्वतः बाळासाहेबांनी यास आक्षेप घेतल्याने मनसेने त्यानंतर कधीही त्यांच्या फोटोंचा वापर केला नव्हता. त्यामुळे आता अचानक एका कार्यकर्त्याने बाळासाहेबांचा फोटो लावल्यानंतर हा मुद्दा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

(हेही वाचा – CM Medical Assistance Cell च्या मदतीने चिमुकल्याच्या मेंदूची दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण; आई म्हणाली, आमच्यासाठी…)

संदीप देशपांडे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

या वादावर मनसे (MNS) नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देत म्हटले की, “बाळासाहेबांचा फोटो बॅनरवर लावणे हे पक्षाचे अधिकृत धोरण नाही. ही एखाद्या उत्साही कार्यकर्त्याची भावना असू शकते. मात्र, महापौर बंगला ताब्यात घेताना बाळासाहेब देशाचे होते आणि आता ते फक्त तुमचे वडील कसे काय?” असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे.

मनसे-शिवसेना वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता

गुढीपाडवा मेळाव्याच्या पूर्वसंध्येला उफाळलेला हा वाद मनसे (MNS) आणि शिवसेना (उबाठा) यांच्यातील संघर्ष अधिक चिघळवू शकतो. बाळासाहेब ठाकरे यांच्या वारशावरून सुरू असलेले राजकीय वाद आता आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. यावर राज ठाकरे काय भूमिका मांडतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.