Bihar Political Crisis: आता बिहारमध्ये राजकीय भूकंप, नितीश कुमारांनी घेतला भाजपशी काडीमोड

140

राज्यात झालेल्या नाट्यमय सत्तांतरानंतर मंगळवारी शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. त्यामुळे महाराष्ट्रातील सरकारला एकीकडे स्थिरता येत असताना दुसरीकडे बिहारमध्ये सत्तासंघर्षाचा दुसरा अंक सुरू झाला आहे. बिहारमध्ये सत्तेत असलेले नितीश कुमार यांच्या जेडीयू आणि भाजपचे सरकार कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नितीश कुमार यांनी भाजपसोबत काडीमोड घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजपला हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

भाजपशी काडीमोड

भाजप आणि जेडीयूने मिळून बिहारमध्ये सत्ता स्थापन केली होती आणि नितीश कुमार हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. पण आता नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाने भाजपसोबत काडीमोड घेतला असून त्यांनी युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी नितीश कुमार यांनी जेडीयूच्या सर्व खासदार आणि आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत हा निर्णय झाल्याचे सांगण्यात येत असून, लवकरच नितीश कुमार हे बिहारच्या राज्यपालांना भेटणार असल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचाः ‘हा छोटा मंत्रिमंडळ विस्तार, पण…’, मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर केसरकरांची पहिली प्रतिक्रिया)

जेडीयू-भाजपमध्ये तणाव

2020 रोजी बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जेडीयूला भाजपपेक्षा कमी जागा मिळाल्या होत्या. तरीसुद्धा भाजपने नितीश कुमार यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली होती. पण त्यानंतर थोड्याच काळात जेडीयू आणि भाजपमध्ये मतभेद निर्माण झाले होते. जेडीयूवर हल्ला करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील नेत्यांना मोकळीक दिल्याची भावना जेडीयूमध्ये निर्माण झाली होती.

त्यामुळे हा तणाव वाढत चालल्यामुळे नितीश कुमार यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच बिहारमधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या आरजेडी सोबत नितीश कुमार पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.