शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली असून महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकनाथ आणि शिवसेना यांच्यातील वाद आता टोकाला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, या सगळ्या प्रकरणात दैनिक सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आले आहे. यातून एकनाथ शिंदे गटाला इशाराही दिल्याचे दिसून आले आहे. यामध्ये असे म्हटले की, गुजरातमध्ये या मंडळींनी जरूर दांडिया खेळावा, पण महाराष्ट्रात तलवारीस तलवार नक्कीच भिडेल!
(हेही वाचा – महाविकास आघाडी सरकार कोसळणार? पवारांचे दोन शब्दांत उत्तर)
शिंदेंचे बंड अधिक तीव्र होत असताना शिवसेनेचे ३५ नव्हे तर ४० आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा त्यांनी केला होता. या सर्व आमदारांना बुधवारी आसाममधल्या गुवाहाटी इथे नेण्यात आले. शिवसेनेकडून शिंदेंच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू असताना ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे. या सर्व घडामोडींनंतर शिवसेनेने सामना वृत्तपत्रातून भाजपवर हल्लाबोल केला. शिंदेंच्या मानगुटीवर बसून भाजप ऑपरेशन कमळ घडवतंय असा आरोप सामना वृत्तपत्रातून केल्याचे पाहायला मिळाले.
काय म्हटले अग्रलेखात
दैनिक सामनाच्या अग्रलेखातून एकनाथ शिंदे गटावर टीका करण्यात आली आहे. यामध्ये असे म्हटले की, विधान परिषद निकालाने त्या ईस्ट इंडिया कंपनीचा आत्मा महाराष्ट्रात फडफडताना दिसला. बरे झाले, या निमित्ताने महाराष्ट्र जागा झाला. महाराष्ट्र जागा झाला की पेटून उठतो, हा इतिहास ईस्ट इंडिया कंपनीच्या फितूर मंडळाने लक्षात घ्यावा. महाराष्ट्रातल्या सरकारचे काय व कसे होणार, हा प्रश्न नसून महाराष्ट्रावर वार करणाऱ्यांचे, महाराष्ट्राशी बेइमानी करणाऱ्यांचे काय होणार? फितुरीचे बीज रोवणाऱ्यांचे काय होणार? धर्माच्या मुखवट्याखाली अधर्माशी संग करणाऱ्यांना जनता माफ करील काय? हे खरे प्रश्न आहेत. संकटांशी व वादळांशी सामना करण्याची शिवसेनेला सवय आहे. गुजरातच्या भूमीवरून फडफड करणाऱ्यांनी हा इतिहास पुन्हा एकदा समजून घ्यावा! गुजरातमध्ये या मंडळींनी जरूर दांडिया खेळावा, पण महाराष्ट्रात तलवारीस तलवार भिडेल हे नक्कीच!
Join Our WhatsApp Community