झारखंडचे (Jharkhand) मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केल्यावर त्यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागले. त्यानंतर त्यांच्या जागी झारखंड मुक्ती मोर्चाचे चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र आत झारखंडमध्ये पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण काँग्रेसचे १२ पैकी ८ आमदार दिल्लीत गेले आहेत.
झारखंडच्या (Jharkhand) राजकारणात पुन्हा वादळ घोंघावत असल्याची माहिती मिळत आहे. झारखंड सरकारमध्ये मंत्री न मिळाल्याने काँग्रेसच्या काही आमदारांमध्ये प्रचंड नाराजी असल्याची माहिती मिळत आहे. या नाराज आमदारांची संख्या १२ आहे. यापैकी ८ आमदार नवी दिल्लीत दाखल झाले. ते पक्षश्रेष्ठींसोबत बातचित करुन आपली भूमिका मांडणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे नाराज आमदार बंगळुरुत जाण्याची शक्यता असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. या आमदारांकडून पक्षश्रेष्ठींकडे चार मंत्र्यांची तक्रार केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्याकडून या चार मंत्र्यांकडील मंत्रीपद काढून दुसऱ्या कुणाला संधी देण्यात यावी, अशी विनंती करण्यात येण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा Bomb : दंगलीच्या वेळी बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी बॉम्ब बनवणाऱ्या जावेदला अटक)
१२ आमदार हे मंत्रिपद न मिळाल्याने नाराज
झारखंडमध्ये (Jharkhand) गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केली आहे. ईडीच्या कारवाईमुळे त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या राजीनाम्यानंतर प्रचंड नाट्यमय घडामोडी घडल्या. राज्यपालांनी सरकार स्थापनेचा प्रस्ताव देण्यापासून ते सरकार स्थापन होईपर्यंत, तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार होईपर्यंत या घडामोडी सुरुच राहिल्या. त्यानंतर आतादेखील तशाच हालचाली घडत आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाचे ज्येष्ठ नेते चंपई सोरेन हे सध्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. पण त्यांच्या सरकारमधील आमदारांमध्ये धुसफूस असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे १२ आमदार हे मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असल्याची चर्चा आहे. पण तरीही चंपई सोरेन यांच्या सरकारवर त्याचा काहीच परिणाम होणार नाही, असे स्वत: चंपई सोरेन यांनी म्हटले आहे. आमचे गठबंधन मजबूत आहे, असे चंपई सोरेन म्हणाले आहेत.
Join Our WhatsApp Community