मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्राला दसरा मेळाव्यांची तशी जुनीच परंपरा आहे. (Dasara Melava) यावर्षी राज्यात दसऱ्याच्या दिवशी एकूण पाच ठिकाणी मिळावे होणार आहेत. यामुळे विजयादशमीच्या दिवशी राजकीय शिमगा पाहायला मिळणार का ? कोणता मेळावा राजकीय, सामाजिक किंवा सकारात्मक पद्धतीचे दिशादर्शन करेल ?
(हेही वाचा – Israel- Palestine Conflict : इस्रायलचे मोठे नुकसान , २०३ लोकांना ठेवले ओलीस तर ३०६ जणांचा मृत्यू)
दसरा मेळाव्याची सगळ्यात जुनी परंपरा आहे. ती खरेतर रामलीलांची. दसऱ्याच्या दिवशी देशात दिल्लीच्या रामलीला मैदानात किंवा मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर रामलीलांच्या शेवटी रावणदहनाचा कार्यक्रम असतो. अगदी दिल्लीतील या रावणदहनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थिती लावतात. ही परंपरा काँग्रेसच्या काळातही पाळली गेली. या पाठोपाठ दसरा मेळावा सुरू झाला, तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा १९२५ मध्ये डॉक्टर हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली आणि १९२६ पासून दरवर्षी नागपूरमध्ये संघाच्या मुख्यालयाच्या मैदानात हा दसरा मेळावा होतो. सरसंघचालक दरवर्षी न चुकता या मेळाव्यात भाषण करतात. (Dasara Melava)
राज्यातला दुसरा दसरा मेळावा सुरू झाला, तो १९६६ मध्ये म्हणजे शिवसेनेच्या स्थापनेच्या नंतर साधारण ४ महिन्यांनी पहिला दसरा मेळावा झाला. पुढे १९८२ मध्ये गिरणी कामगारांच्या संपाच्या संदर्भात बाळासाहेब ठाकरे यांनी केलेले ऐतिहासिक भाषण त्याच वेळेला दसरा मेळाव्यात केले. काँग्रेसमध्ये असणारे शरद पवार आणि जॉर्ज फर्नांडिस यांनासुद्धा दसरा मेळाव्यात आमंत्रित करण्यात आले होते. सेनेच्या दृष्टीने ते खूपच वेगळे होते. २०१० मध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि विद्यमान युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हातात तलवार देऊन त्यांचे राजकारणात लॉन्चिंग झाले. पुढे २४ ऑक्टोबर २०१२ ला दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे त्यांच्या प्रकृती अस्वस्थमुळे प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी एक व्हिडिओ संदेश मात्र निश्चित दिला आणि ‘उद्धव ठाकरे यांना सांभाळा’, असे सांगितले. दसरा मेळाव्याच्या त्या भाषणात कडक शब्दांत टीका करणारे बाळासाहेब हळवे झाल्याचे महाराष्ट्राने पाहिले. पुढे २००६ मध्ये प्रचंड पावसामुळे, तर २००९ मध्ये निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे दसरा मेळावा झाला नाही आणि मग कोरोनाच्या २ वर्षांतही दसरा मेळावा शिवाजी पार्क येथे झाला नाही; पण शिवाजी पार्कवरची म्हणजे शिवसेनेच्या शिवतीर्थावरची दसरा मेळाव्याची परंपरा आजही कायम आहे. यंदाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला इथे परवानगी मिळाली; म्हणजे शिंदे यांच्या शिवसेनेने एक पाऊल मागे घेतले.
तिसरा दसरा मेळावा सुरू झाला तो भाजपच्या गोपीनाथ मुंडे यांचा भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी बीडच्या भगवानगडावर दसरा मेळाव्याच्या दिवशी बोलण्याची परंपरा आहे. ती साधारण ३० ते ३२ वर्षे जुनी पण २०१६ मध्ये पहिल्यांदा म्हणजे गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर दोन वर्षांनी भगवानगडावर दसरा मेळाव्यासाठी बंदी घालण्यात आल्याची घोषणा तिथले मठाधिपती महंत नामदेव शास्त्री यांनी केली. गोपीनाथ मुंडे यांच्या उत्तराधिकारी आणि कन्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सावरगाव येथे ‘गोपीनाथगड’ उभारून तिथे दसरा मेळावा सुरू झाला. मुंडे यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे हजारो बांधव दरवर्षी या दसरा मेळाव्याला गर्दी करतात. यापूर्वीच्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी त्यांच्यावरच्या अन्यायासह विविध मुद्द्यांना हात घातला होता. यावर्षी काय होते, हे पाहणे औत्सुक्याचा आहे. (Dasara Melava)
तिकडे शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर म्हणजे गेल्या वर्षीपासून शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन वेगवेगळे दसरा मेळावे राज्याला पाहायला मिळतात. गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी शिवाजी पार्कच्या दसरा मेळाव्यासाठी ठाकरे आणि शिंदे यांच्यात वाद होणार होता; पण शिंदे यांनी एक पाऊल मागे घेतले. ठाकरे यांच्या विचारांचा वारसा, काँग्रेस, हिंदुत्व, भाजपचा विरोध, इंडिया आघाडी यासह राज्यातल्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरून मुंबई शिवाजी पार्कवर आणि आझाद मैदानावर असे दोन दसरा मेळावे पाहायला मिळतील.
या सगळ्या दसरा मेळाव्यात भर म्हणून कि काय, आणखी २ दसरा मेळावे होणार आहेत. त्यातला एक आहे नगर जिल्ह्यातल्या चौंडी येथे धनगर समाजाचा. चौंडी येथे धनगर समाजाच्या वतीने उपोषण आंदोलन सुरू आहे दसऱ्याच्या दिवशी इथे मोठ्या संख्येने धनगर बांधव एकत्र येणार आहेत. अर्थातच भाषण तर होणारच आणि मग राजकीय आरोप प्रत्यारोपसुद्धा !
दुसरा एक मेळावा आहे, तो आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा ! दोन राष्ट्रवादी काँग्रेस संघर्षयात्रेच्या पूर्वसंध्याला मेळावा होणार आहे. या युवक संघर्ष यात्रेची सुरुवात दसऱ्याच्या दिवशी पुण्यात शरद पवार यांच्या मार्गदर्शन सभेने होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा सोडला, तर शिवसेनेचे २, पंकजा मुंडे यांचा एक आणि अन्य राजकीय मेळाव्यात स्वाभाविकपणे मोठ्या प्रमाणात राजकीय आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतीदावे रंगणार, यात काही शंका नाही. प्रामुख्याने शिंदे आणि ठाकरे यांच्यात तर मोठी राजकीय चिखलफेक होणार, हे नक्की आहे. धनगर मेळाव्यातसुद्धा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य आणि केंद्र सरकारवर टीकेची तोफ टाकली जाईल. याशिवाय पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यातसुद्धा पाठीराख्यांची समजूत काढतानाच भावनिक आवाहन आणि भाजपच्या श्रेष्ठींना खडे बोल सुनावले जातील एवढे निश्चित ! त्यामुळे पाहूयात दसऱ्याच्या दिवशी होणाऱ्या या पाच दसरा मेळाव्यांमुळे खरंच विचारांचे सोनं लुटलं जातं का ? राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि या सगळ्या गोष्टींमुळे चिखल, नव्हे शिमगा होतो का ? (Dasara Melava)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community