आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील शाब्दिक ‘प्रहार’ दिवसागणिक तीव्र होऊ लागला आहे. ‘पैशांच्या मोहापायी बच्चू कडू गुवाहाटीला गेले’, असा आरोप राणा यांनी करताच कडू आणखी खवळले असून, पैसे घेतल्याचे पुरावे न दिल्यास १ नोव्हेंबरनंतर आठ आमदारांसह वेगळी चूल मांडण्याचा इशारा दिला आहे. परंतु, बच्चू कडू यांचा हा इशारा म्हणजे कॅबिनेट मंत्रिपदासाठी दबावतंत्र तर नाही ना, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
अपक्ष आमदार असूनही ठाकरे सरकारमध्ये बच्चू कडू यांना शालेय शिक्षण आणि कामगार विभागाचे राज्यमंत्री पद देण्यात आले होते. मात्र, मंत्रिपदाचा त्याग करून त्यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली. शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान मिळेल अशी अशा होती. परंतु, अन्य अपक्ष आमदार नाराज होण्याच्या शक्यतेमुळे आयत्या वेळेस त्यांचा पत्ता कापला गेला. पुढील मंत्रिमंडळ विस्तारात संधी देण्याचे आश्वासन त्यांना त्यावेळी देण्यात आले.
आता दिवाळीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जी संभाव्य नावे समोर येत आहेत, त्यात कडू यांचा समावेश असला, तरी पुन्हा राज्यमंत्री पदाचीच माळ गळ्यात पडण्याची दाट शक्यता आहे. मात्र, ते कॅबिनेट मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. शिंदे गट आणि भाजपामधील इच्छुकांची संख्या आणि उपलब्ध पदांची स्थिती पाहता, कडू यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळणे कठीण दिसते. त्यामुळेच त्यांनी राणांच्या विधानाआडून ‘कॅबिनेट’साठी दबावतंत्राचा अवलंब सुरू केल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
बच्चू कडू पैशांसाठी गुवाहाटीला गेले, असा आरोप भाजपासमर्थक अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला. मात्र, या आरोपामुळे कडू पुरते खवळले असून, हा माझ्या एकट्याचा नव्हे, तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या सर्व ५० आमदारांचा अपमान आहे, असे त्यांनी म्हटले आहे. मी पैसे घेतल्याचे पुरावे येत्या १ नोव्हेंबरपर्यंत सादर न केल्यास आठ आमदारांसह वेगळा निर्णय घेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
‘ते’ आठ आमदार कोण?
बच्चू कडू यांना शिंदे गटातील आठ आमदारांनी पाठिंबा द्यावा, इतके मोठे नेतृत्व आजमितीला तरी ते नाहीत. शिवाय कडू यांच्यासोबत जाऊन आमदारांना राजकीय दृष्ट्या कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही. दुसरीकडे एखादा आमदार फुटल्यास शिंदे-फडणवीस मिळून त्याची चौफेर कोंडी करू शकतात, हे ज्ञात असल्यामुळे बच्चू कडू यांनी केलेला दावा केवळ बोलापुरता असल्याचे बाळासाहेबांच्या शिवसेनेतील एका नेत्याने खासगीत सांगितले.
Join Our WhatsApp Community