पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाकिस्तान जिंदाबाद आणि नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबरच्या घोषणाबाजीवर आता राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप नेते नितेश राणे अशा प्रकारच्या घोषणा देणा-यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, यापुढे कोणी पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावले तर ते परत घरी जाणार नाहीत, असा इशारा राणे यांनी दिला आहे. या घोषणाबाजीविरोधात रस्त्यावर उतरु, गरज वाटल्यास घरात घुसू, असे राणे म्हणाले आहेत.
भारतात राहून जर कोणी पाकिस्तान जिंदाबाच्या घोषणा देत असेल, तर पोलीस खात्याने त्यांच्यावर कडक कारवाई करावी. अशा प्रवृत्तींची हिम्मत तोडण्याचे काम पोलिसांनी करावे, असे आवाहन राणे यांनी केले आहे. आम्हाला आमचा देश आणि राज्य वाचवायचे आहे. देशाकडे वाकड्या नजरेने पाहणा-यांविरोधात आम्ही लढत आहोत. पुण्यातील नारेबाजीमुळे राज्याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे राणे यावेळी म्हणाले. अशा प्रकारावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. राज्यातील हिंदूत्ववादी सरकारने या लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी राणे यांनी केली.
( हेही वाचा: अविश्वास दाखवणा-यांचा आता न्यायालयावरील विश्वास वाढेल; भाजपचा उद्धव ठाकरे गटाला टोला )
पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात
शुक्रवारी सायंकाळी पुण्यातील मुस्लिम समुदायामधील काही व्यक्तींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने केलेल्या कारवाईविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान पाकिस्तान जिंदाबाद आणि नारा- ए- तकबीर, अल्लाह हू अकबरची घोषणाबाजी करण्यात आली. पीएफआयविरोधात करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचे नियोजन या आंदोलकांनी केले होते. मात्र, हे आंदोलन सुरु होण्याच्याआधीच पुणे पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले.