तौक्ते चक्रीवादळाने कोकणात धुमशान घातल्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता हे नैसर्गिक वादळ शमले असले, तरी कोकणात आता नेत्यांचे राजकीय वादळ सुरू झाले आहे. विरोधी पक्ष नेत्यांपासून आता सत्ताधारी पक्षातले सर्वच नेते कोकणात पाहणी दौऱ्यावर असून, या नेत्यांच्या दौऱ्याने कोकणी जनतेला फायदा होणार की हे दौरे फक्त राजकीय आरोप-प्रत्यारोपांची वावटळ उठवणार, असा प्रश्न मात्र सध्या सर्वसामान्य कोकणवासीयांनी पडला आहे.
दोन्ही विरोधी पक्षनेते कोकणात
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे सध्या कोकणाच्या दौऱ्यात असून, ते नुकसानग्रस्त भागांची पाहणी करत आहेत. त्यांनी तीन दिवसीय कोकण दौऱ्याला बुधवारी सुरुवात केली. पहिल्या दिवशी त्यांनी रायगड जिल्ह्याचा दौरा करुन, नुकसानाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. तर गुरुवार आणि शुक्रवारी ते रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पाहणीसाठी जाणार आहेत.
(हेही वाचाः कोकणवासीयांना भरघोस नुकसान भरपाई द्या! फडणवीसांची सरकारकडे मागणी)
भरीव पॅकेज देण्याची मागणी
महाराष्ट्राचा विचार केला तर सुदैवाने नुकसान झालेले क्षेत्र कमी आहे, पण ज्या भागात झाले आहे त्या नुकसानाचा आवाका मोठा आह. त्यामुळे शासनाने निसर्ग चक्रीवादळात दिलेल्या तुटपुंज्या मदतीप्रमाणे मदत न देता, तातडीने पंचनामे पूर्ण करुन, भरीव नुकसान भरपाईचे पॅकेज जाहीर करावे. केंद्र सरकार एसडीआरएफला निधी देतच असते, त्यामुळे राज्य सरकारने तातडीने मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारकडे केली आहे. त्यांनी रायगड जिल्हाधिकारी यांची भेट घेतली, त्यांच्याकडून सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी खानाव उसर आणि वावे येथील नुकसानग्रस्त भागाची, अलिबाग येथील कोळीवाड्यातील नुकसानग्रस्त घरांची तसेच बोटींच्या झालेल्या नुकसानाची पाहणी केली.
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्रीही कोकणात
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे सुद्धा गुरुवारपासून कोकण दौऱ्यावर असून, 20 ते 23 मेपर्यंत ते कोकणातील नुकसानाची पाहणी करणार आहेत. या तीन दिवसांच्या दौऱ्यात ते अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन नुकसानाचा आढावाही घेणार आहेत.
(हेही वाचाः कोकण किनारपट्टीला वादळाचा जबर फटका! )
मुख्यमंत्रीही करणार कोकणाचा दौरा
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत हे कोकणच्या दौऱ्यावर आहेत. कोकणातील नुकसानाची पाहणी केल्यानतंर उदय सामंत यांनी येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही कोकणात येऊन नुकसानाची पाहणी करणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा दोन दिवसांचा असेल. मुख्यमंत्री उद्वव ठाकरे शुक्रवारी कोकणातील नुकसानाची पाहणी करतानाच ग्रामस्थांशीही संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते एक आढावा बैठक घेऊन अधिकाऱ्यांकडून नुकसानाची माहिती घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर विरोधकांची टीका
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली असून, भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दौरा हा लिपस्टिक दौरा आहे. लिपस्टिक लावल्यावर सगळे कसे छान सुंदर आहे हे दाखवले जाते आणि तोंड धुतल्यावर सगळे निघून जाते, तसे आहे सगळे असे म्हणत त्यांनी टीका केली आहे. गेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तुलनेत प्रचंड नुकसान सिंधुदुर्गाचे झाले आहे. महाविकास आघाडी सरकारकडून अपेक्षा कशा ठेवणार? मागचा अनुभव फार वाईट आहे. निसर्ग चक्रीवादळाची नुकसान भरपाई अजून मिळाली नाही.
(हेही वाचाः मोंदीच्या गुजरात भेटीवरुन महाराष्ट्रात राजकीय ‘वादळा’ला जोर! संजय राऊत म्हणाले…)
हे बघा ठाकरे सरकारचं कोकणावर किती प्रेम !
— nitesh rane (@NiteshNRane) May 18, 2021
इतक प्रेम कधीच कोणी केले नाही कोकणावर..
आता ही भरभरून देतील बघा..
आभार ! @CMOMaharashtra
पुरावे 👇 pic.twitter.com/yZMiWrp4gT
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काल मी माहिती घेतली, 8 कोटींपैकी फक्त 49 लाख मिळाले. आज मुख्यमंत्री पंचनामे करण्याचे आदेश देतात मग ते पंचनामे रद्दी भरण्यासाठी ठेवले आहेत का? अधिकारी पर्यटनासाठी गावागावात फिरतात का? मुख्यमंत्री उद्या कोकणात येऊन काय दिवे लावणार आहेत? असेही नितेश राणे म्हणाले.
Join Our WhatsApp Community