मोंदीच्या गुजरात भेटीवरुन महाराष्ट्रात राजकीय ‘वादळा’ला जोर! संजय राऊत म्हणाले…

गुजरातमधील सरकार कमकुवत आहे म्हणून मोदी तिथे गेले असतील, असा शालजोडीतील वार संजय राऊत यांनी केला आहे.

तौक्ते चक्रीवादळानंतर झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचा दौरा केला. पण या वादळाच्या पाहणी दौ-याआधीच, महाराष्ट्रातील राजकीय वादळाने जोर धरला आहे. सातत्याने मोदी सरकारवर होत असणा-या टीकांच्या लाटेला आता चांगलीच भरती आली आहे. मोदींच्या या दौ-याबाबत प्रतिक्रिया देताना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोणत्याही संकटाचा सामना करण्यास सक्षम आहेत, हा विश्वास मोदींना पटला असावा. म्हणूनच त्यांनी महाराष्ट्राचा दौरा न करता केवळ गुजरातचा दौरा करायचे ठरवले असावे, अशी उपहासात्मक टीका संजय राऊत यांनी केली.

काय म्हणाले राऊत?

प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत यांना मोदींच्या गुजरातमधील हवाई पाहणीबाबत विचारले असता, संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली. चक्रीवादळामुळे महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या तिन्ही राज्यांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे कोणावरही टीका करण्याची ही वेळ नाही. पण गुजरात हे मोदींचे स्वतःचे राज्य आहे, त्यामुळे ते फक्त गुजरातला जात असावेत. महाराष्ट्रातील ठाकरे सरकार कोणत्याही संकटाचा खंबीरपणे सामना करण्यास अतिशय सक्षम आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या संकटावरही मात करतील, अशी पंतप्रधान मोदींची खात्री पटली असावी, त्यामुळे ते महाराष्ट्रात आले नसावेत. त्यामानाने गुजरातमधील सरकार जरा कमकुवत आहे असे त्यांना वाटले असेल म्हणून ते तिथे गेले असतील, असा शालजोडीतील वार सुद्धा संजय राऊत यांनी केला आहे.

मोदींनी केली हवाई पाहणी

महाराष्ट्रासह शेजारील गुजरात आणि दीव ला सुद्धा तौक्ते चक्रीवादळाचा चांगलाच तडाखा बसला आहे. त्यामुळे गुजरातमध्ये झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातची हवाई पाहणी केली. भावनगर येथून त्यांनी ऊना, दीव, जाफराबाद आणि महुवाची हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने पाहणी केली. चक्रीवादळाने नुकसान झालेल्या सर्व राज्यांच्या पाठीशी केंद्र सरकार ठामपणे उभे राहील, असे त्यांनी यावेळी सांगितले. या पाहणीनंतर ते अहमदाबाद येथे आढावा बैठक सुद्धा घेणार आहेत.

(हेही वाचाः केंद्राने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले! शरद पवारांची टीका )

फडणवीस-दरेकरांचा तीन दिवसांचा दौरा

तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीला मोठ्या प्रमाणावर बसला आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे याबाबत आढावा घेण्यासाठी महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांनी तीन दिवसांचा कोकण दौरा सुरू केला आहे. या तीन दिवसांत कोकणातील परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन, मदतकार्य करण्यासाठी काही त्रुटी असल्यास त्या सरकार पर्यंत पोहोचवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा कोकण दौरा करणार असल्याने, ही चांगली गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांनी जायलाच हवं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

(हेही वाचाः भारतातील लसीकरणावरुन होणा-या आरोपांना आता सीरमने दिले उत्तर)

मुख्यमंत्रीही घेणार आढावा

विरोधी पक्ष नेत्यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा दोन दिवसांचा कोकण दौरा करणार आहेत. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत हे कोकणच्या दौऱ्यावर आहेत. दोन दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही कोकणात येऊन नुकसानीची पाहणी करतील, असे उदय सामंत यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा दोन दिवसांचा असेल. मुख्यमंत्री उद्वव ठाकरे शुक्रवारी कोकणातील नुकसानीची पाहणी करतानाच तेथील ग्रामस्थांशीही संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते एक आढावा बैठक घेऊन अधिकाऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here