प्रकाश आंबेडकर आणि आमच्यात सकारात्मक चर्चा झाली आहे. काही बारीकसारीक गोष्टींची सोडवणूक झाली की अंतिम भूमिका जाहीर करू, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत युतीचे स्पष्ट संकेत दिले.
( हेही वाचा : मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! मिळेल १ लाखांहून अधिक पगार, ‘येथे’ करा अर्ज)
विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी सोमवारी मविआच्या नेत्यांची बैठक पार पडली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, संजय राऊत, भाई जगताप, मिलिंद नार्वेकर आदि या बैठकीला उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना ठाकरे यांनी वंचितशी युतीबाबत सूतोवाच केले.
उद्धव ठाकरे म्हणाले, प्रकाश आंबेडकर आणि आमच्यात सकारात्मक चर्चा झाली. त्यांची महाविकास आघाडीत येण्याची इच्छा आहे. नंतर अडथळे येतील, असे विषय आताच सोडवावेत, असे आमचे प्रयत्न आहे. त्यामुळे काही बारीकसारीक गोष्टींची सोडवणूक झाली की पुढील भूमिका लवकरच जाहीर करू.
…तर ते पुन्हा गुवाहाटीला जातील
येत्या काळात कर्नाटकची निवडून होऊ घातली आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र फोडण्याचे कारस्थान रचले जात आहे. महाराष्ट्र आजवर कोणासमोर झुकलेला नाही. पण कर्नाटक सरकारपुढे महाराष्ट्र सरकार पळपुटेपणाची भूमिका घेत आहे. राज्यात फुटीरतेची बीजे रोवली जात आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमकपणे बोलत असताना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मूग गिळून गप्प बसले आहेत. कर्नाटक प्रश्नावर बोलण्यासाठी त्यांना पुन्हा गुवाहाटीला जावे लागेल, असा खोचक टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.
राज्य सरकारचे अपयश – अजित पवार
सत्ताधाऱ्यांनी आलेले उद्योग घालवले आणि नको ते उद्योग सुरू केले आहेत. जतचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी महाविकास आघाडीने निधी मंजूर केला होता. पण या सरकारने त्याला स्थगिती दिली. महाराष्ट्रातील गावांनी आजवर कधी कर्नाटकात जाण्याची इच्छा वर्तवली नाही. पण आता जागोजागी तशी मागणी होत आहे, हे या सरकारचे अपयश आहे, अशी टीका विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केली.
Join Our WhatsApp Community