भारत भौगोलिक मानांकन उत्पादन मेळाव्यात महाराष्ट्रातील भौगोलिक मानांकने प्राप्त हळद, डाळिंब, केळी, गुळ, हस्तशिल्प तसेच हातमाग आदी उत्पानांची दालने उभारण्यात आली होती. या दालनांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याची भावना सहभागी संस्थांनी व्यक्त केली.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय आणि वस्त्रोद्योग मंत्रालयांच्या अधिनस्त निर्यात प्रमोशन कौन्सिल फॉर हॅन्डीक्राफ्ट्स (EPCH) द्वारे इंडिया एक्स्पो सेंटर आणि नॉलेज पार्क, ग्रेटर नोएडा येथे हस्तकलेसाठी निर्यात प्रोत्साहन परिषद GI (भौगोलिक मानांकन) फेअर इंडिया २०२३ चे आयोजन २० ते २४ जुलै २०२३ या दरम्यान करण्यात आले होते. या मेळ्याव्यात ४६० पेक्षा जास्त भौगोलिक मानांकन उत्पादनांचे दालन उभारण्यात आले होते.
इंडिया एक्स्पो सेंटर आणि मार्ट, ग्रेटर नोएडा येथे या मेळाव्याचे उद्घाटन २० जुलै रोजी केंद्रीय रेल्वे व वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश यांच्या हस्ते झाले. यावेळी निर्यात प्रमोशन कौन्सिल फॉर हॅन्डीक्राफ्ट्सचे अध्यक्ष दिलीप बैद सह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
भौगोलिक मानांकन (GI) म्हणजे काय ?
भौगोलिक चिन्ह हे विशिष्ट उत्पादनांना दिलेले नाव किंवा चिन्ह आहे. ज्या उत्पादनांची पौष्टिकता व वैज्ञानिक महत्त्वानुसार, विशिष्ट भौगोलिक स्थानाशी संबंधित आहे किंवा राष्ट्रीय स्तरावर ओळखले जात असलेल्या उत्पादनांना भौागोलिक संकेत देण्यात येते. या उत्पादनाशी समाजाची बौद्धिक संपदा जोडलेली असते. या मेळ्याव्यात, महाराष्ट्राच्या वतीने येथे भौगोलिक मानांकने मिळालेल्या उत्पानाची दालने उभारण्यात आली होती. यामध्ये ७ हस्तशिल्पांची, २१ शेतमालाशी निगडित उत्पादनांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.
यामध्ये वायगाव, वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथील शोभा गायधने यांचे विदर्भ नैसर्गिक शेतमाल उत्पादन किसान कंपनी मर्यादीत यांचे दालन होते. याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, आरोग्यवर्धक वायगाव हळदीला भौगोलिक मानांकन मिळाल्यानंतर सोन्याचे दिवस आले आहेत. वायगाव व परिसरातील जे शेतकरी पिढ्यान्पिढ्या वायगाव जातीच्या हळदीची लागवड करीत आहेत, त्यांना भौगोलिक मानांकन व औषधी गुणधर्मांमुळे बाजारात इतर हळदीच्या तुलनेत अधिक भाव मिळत आहे. वायगावची हळद महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात लोकांच्या पसंतीस उतरत आहे व आम्ही आणलेली सर्व हळद दोन दिवसांतच संपल्याचे त्यांनी सांगितले.
या मेळाव्यात सहभागी झालेले अशोक प्रभाकर गाडे हे केळ्यांपासून विविध पदार्थ तयार करतात. या मेळाव्यात सहभागी झाल्याचा आनंद व्यक्त करत त्यांनी सांगितले की, केळीवर नैसर्गिकरित्या प्रक्रिया करुन त्यास आम्ही मुल्यवर्धन करत विविध पदार्थ तयार करतो. यामध्ये बिस्किटे, कॅन्डी, पापड, चिप्स, लाडू, पीठ, चिवडा, जॅम आदी पदार्थांचा समावेश आहे. यापुढे माहिती देतांना त्यांनी सांगितले की, त्यांची बिस्किटे जगभरात प्रसिध्द असून, पेटंट मिळवणारे त्यांची पहिली संस्था आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्र संशोधन व प्रशिक्षण केंद्र, वसमत-हिंगोली या संस्थेनीही आपला सहभाग नोंदवला. हळदीच्या उत्पादनासाठी, हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे ६५ एकर जमीनीवर देशभरातील ३३ जातींची लागवड करण्यात येणार असल्याचे तांत्रिक अधिकारी रमेश देशमुख यांनी सांगितले. याशिवाय भौगोलिक मानांकन प्राप्त सेलम जातीच्या हळदीला या मेळाव्यात उत्तम प्रतिसाद मिळत असल्याची प्रतिक्रिया दिली.
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुका येथे तिरंगा गुळ पावडर तयार करणारे विजय लाड हे त्यांच्या उत्पादनांबद्दल सांगताना म्हणाले की, पश्चिम घाटातील जैव विविधतेने समृध्द असलेल्या पंचगंगा नदी काठच्या सुपीक प्रदेशातील निवडक ऊसापासून ही पावडर बनविली जाते. अनुकुल हवामान, स्व:च्या गुर्हाळ घरात तज्ञांकडून पारंपारिक पध्दतीने गुळाला शिजवून एका विशेष पध्दतीने गुळाला विशिष्ट चवीसह सुगंध देऊन हे गुळ पावडर तयार करण्यात येत असल्याची माहिती दिली. तसेच अशा मेळाव्यातून प्रदर्शनातून नवीन ओळख भारतीय वस्तूंना मिळेल आणि जगभरात त्याची प्रसिद्धी होऊन विक्रीसाठी मोठा वाटा मिळेल अशी लाड यांनी आशा व्यक्त केली.
(हेही वाचा – Income Tax : देशातील एक लाख लोकांना इन्कम टॅक्सची नोटीस)
अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादन संशोधन संघ, पुणे येथील व्यवस्थापक मारोती बोराटे यांनी आपल्या उत्पादनाबद्दल माहिती देताना सांगितले की, प्रत्येक जातीच्या डाळिंबाची ओळख त्याच्या रंग, आकार, रसाळ, गोड चव आणि चमक यावर अवलंबुन असते. डाळिंबासारख्या पिकात जगभरात भारताचा वाटा ६० टक्क्यांपर्यंत आहे. आमच्याकडून वर्षभरात किमान पाच कोटीचे डाळिंब निर्यात होत असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्र स्टेट हॅन्डलुम महामंडळ, नागपूर या संस्थेने आपला सहभाग नोंदवला. या संस्थेमार्फत तयार करण्यात येणाऱ्या करवती बॉर्डर साडी व पैठणी रेशीम साड्यांना भौगोलिक मानांकन वर्ष २००९ व वर्ष २०१६ मध्ये मिळाले असल्याची माहिती व्यवस्थापक डी. डब्ल्यु. बाभुळकर यांनी दिली. या मेळ्याव्यात या साड्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याचेही त्यांनी सांगितले. सर्व सहभागी संस्थांच्या उत्पादनाला प्रोत्साहन मिळावे त्यांच्या उत्पादनास चालना मिळावी, जगभर प्रसिद्धी मिळावी, विक्री निर्यात वाढावी, अशी आशा या मेळ्यातून व्यक्त झाली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community