महापालिकेच्या प्रभाग समित्यांसह दोन विशेष समित्यांच्या निवडणुकांना स्थगिती

ज्या चार अध्यक्षांना बदलायचे होते, त्या निवडणुका पार पडल्यानंतरच हे परिपत्रक आल्याने शिवसेनेचे हे पूर्वनियोजित ठरवले होते, असे बोलले जात आहे.

87

मुंबई महापालिकेच्या वैधानिकसह विशेष समित्यांच्या सुरु असलेल्या निवडणुकांवर राज्य शासनाने स्थगिती आणली आहे. त्यामुळे विधी व महसूल आणि महिला व बाल कल्याण समितीसह सर्व प्रभाग समिती अध्यक्षांच्या निवडणुकांवर स्थगिती आली आहे. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेत सत्ताधारी पक्षाला ज्या चार विशेष समितीचे अध्यक्ष बदलायचे होते, त्या समित्यांच्या निवडणुका पार पडल्यानंतर अशाप्रकारचे राज्य शासनाच्या नगरविकास खात्यामार्फत आदेश जारी होण्यामागे शंका उपस्थित होत आहे. मुंबईसह राज्यांमधील विविध शहरांमध्ये रुग्णांची संख्या वाढत असताना या सर्व निवडणुका यापूर्वीच स्थगित व्हायला हव्या होत्या. परंतु नेमके अध्यक्षांना हलवल्यानंतरच हे आदेश निर्देशित झाल्यामुळे शिवसेनेला नक्की कुणाचे पत्ते कापायचे होते आणि कुणाचे वाचवायचे होते, असा प्रश्न उपस्थित होतो.

कोविड १९ संक्रमणाचे कारण दिले!

राज्यात कोविड १९ संक्रमणाचा प्रार्दुभाव प्रचंड वेगाने वाढत असल्याने नगरविकास खात्याने महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतीच्या स्थायी समिती व विषय समित्यांच्या सभापती सदस्यांच्या निवडणूक स्थगित करण्याचे आदेश शुक्रवारी ९ एप्रिल रोजी परिपत्रकाद्वारे जारी केले आहे. यामध्ये त्यांनी पुढील आदेशापर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्यात येत असल्याचे सांगितले. राज्यातील कोविड १९च्या संक्रमण परिस्थितीचा आढावा एक महिन्यात घेवून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे या परिपत्रकात म्हटले आहे. मुंबई महापालिकेच्या शिक्षण व स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक ५ एप्रिल रोजी पार पडली. त्यानंतर सुधार व बेस्ट समिती अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. आणि त्यानंतर स्थापत्य शहर, स्थापत्य उपनगरे, सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. शुक्रवारी आरोग्य व बाजार समितीची निवडणूक पार पडल्यानंतर संध्याकाळी हे परिपत्रक महापालिकेला प्राप्त झाले.

(हेही वाचा : दहावी-बारावीची परीक्षा जूनमध्ये होणार?)

शिवसेनेचा हा पूर्वनियोजित कट!

विशेष म्हणजे वैधानिक समितीपैकी बेस्ट समिती अध्यक्ष बदलण्यात आले. तर उर्वरीत समिती अध्यक्षांना कायम ठेवण्यात आले. तर सहा वैधानिक समिती अध्यक्षांपैकी चार अध्यक्षांना बदलण्यात आले. तर ज्या दोन अध्यक्षांना कायम ठेवण्यात आले आहे, त्यांचे उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले असून त्यांच्या निवडणुका होणे बाकी आहे. परंतु ज्या चार अध्यक्षांना बदलायचे होते, त्या निवडणुका पार पडल्यानंतरच हे परिपत्रक आल्याने शिवसेनेचे हे पूर्वनियोजितच होते, असे बोलले जात आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून वैधानिक व विशेष समिती अध्यक्षपदाच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्धार यापूर्वीच झाला होता. परंतु काही निवडणुका होण्याची वाट महापालिका पाहत होती आणि त्यानंतरच शासनाला हे परिपत्रक जारी करण्याच्या सूचना केल्या असाव्यात, असेही बोलले जात आहे. मात्र, या परिपत्रकामुळे १७ प्रभाग समित्यांपैकी ज्या काही अध्यक्षांना बदलायचे होते, त्यांना तुर्तास तरी अभय मिळाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शासनाकडून पुढील आदेश येईपर्यंत तरी या निवडणुका होणार नसल्याने अजून काही महिने हे अध्यक्षपद भुषवता येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.