महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेतल्यानंतर शरद पवार यांच्यासह इतर नेत्यांनी त्यांना आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार वाचण्याचा सल्ला दिला होता. प्रबोधनकारांच्या जयंतीचे औचित्य साधून राज ठाकरेंनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले असून, माझ्या आजोबांचा धर्म ह्या कल्पनेला विरोध नव्हता, उलट ते कमालीचे हिंदू धर्माभिमानी होते, असे म्हटले आहे.
समाजमाध्यमांत केलेल्या पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणतात, आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची आज जयंती. त्यानिमित्त त्यांचे एक दुर्मिळ भाषण इथे मुद्दामून देत आहे. हे भाषण एका कृतिशील विचारवंताचे आहे. माझ्या आजोबांचा धर्म ह्या कल्पनेला विरोध नव्हता, उलट ते कमालीचे हिंदू धर्माभिमानी होते. फक्त धर्माच्या नावाखाली चालणारी भोंदूगिरी, फसवेगिरी त्यांना रुचायची नाही. असली भोंदूगिरी करणाऱ्यांवर ते हल्ला चढवत. थोडक्यात संपूर्ण आयुष्य त्यांनी लोकांच्या मनातील धर्माची भीती काढून, धर्माबद्दल आस्था, प्रेम निर्माण व्हावे म्हणून वेचले.
रझाकारी औलादींच्या गालावर वळ उठवा!
- या भाषणात प्रबोधनकारांनी नाठाळांवर वेळेस रट्टे ओढताना मागे पाहू नका असे आवाहन केले आहे. हे करताना आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतले आहोत हे विसरू नका याची आठवण करून दिली आहे.
- रझाकारी औलादी डोके वर काढत आहेत, अनेक ठिकाणी आया-बहिणींची छेड काढत आहेत, उपरोक्त भाषणात आमच्या आजोबांनी जसे म्हटले आहे तसे त्यांच्या गालावर वळ उठवा. आणि हे करताना मी या पक्षाचा, त्या पक्षाचा असला विचार करायची गरज नाही.
- कदाचित तुमचे नेते कच खातील, पण तुम्ही खाऊ नका… प्रबोधनकारांना अभिवादन करताना एक निर्धार प्रत्येकानेच केला पाहिजे कि, जिथे कुठे अन्याय दिसेल तिथे पेटून उठायचं आणि अन्यायाचा फडशा पाडायचा. हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल, असेही राज यांनी म्हटले आहे.