सुहास शेलार
राष्ट्रवादीतील फुटीसाठी पडद्यामागे भूमिका निभावणाऱ्या कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपद निश्चित झाले आहे. त्यांना ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडील खाते मिळणार असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
रविवारी २ जुलैला अजित पवार यांनी ४० आमदारांसह युती सरकारला पाठिंबा दर्शवल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. मात्र, ही फूट एका दिवसात पडलेली नाही. दोन महिन्यांपासून पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू होत्या. पहाटेच्या शपथविधीप्रमाणे यावेळची खेळी अंगावर येणार नाही याची पूर्ण काळजी भाजपने घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि देवेंद्र फडणवीस या चौघांमध्ये याची रणनीती ठरली. दोन महिन्यांपासून फडणवीस हे अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या संपर्कात होते.
(हेही वाचा – एकनाथ शिंदेंसह सोळा आमदार अपात्रतेबाबत लवकरच होणार निर्णय)
त्यामुळे अजित पवारांसोबत राष्ट्रवादीतील फुटीचे शिल्पकार असलेल्या प्रफुल्ल पटेल यांनाही केंद्रात मंत्रिपद देण्याचे निश्चित झाले आहे. आगामी मंत्रिमंडळ विस्तारत ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडील हवाई वाहतूक खाते त्यांना दिले जाणार असल्याचे कळते. पटेल यांनी आघाडी सरकारच्या काळात या खात्याची जबाबदारी सांभाळली होती. मध्य प्रदेशमध्ये यावर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे ज्योतिरादित्य यांना राज्याच्या (मध्यप्रदेश) राजकारणात लक्ष घालण्याची सूचना केंद्रीय नेतृत्त्वाने केली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community