आगामी महानगरपालिका निवडणूक आणि हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजपा-शिंदे गटाला घेरण्यासाठी महाविकास आघाडीने महामोर्चा काढला असताना, प्रकाश आंबेडकरांनी मात्र त्याकडे पाठ फिरवली आहे. इतकेच नाही तर, सीमावादासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीला जबाबदार धरत शरसंधानही साधले आहे.
( हेही वाचा : मविआच्या महामोर्चाला अशोक चव्हाणांची दांडी; काँग्रेसमध्ये वेगळीच चर्चा)
आंबेडकर म्हणाले, ‘राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत चुकीची तुलना केल्यामुळे जनतेत रोष आहे. तर दुसरीकडे निर्माण झालेला सीमाप्रश्न हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कॅरेक्टर दाखवणारा आहे. कारण महाराष्ट्रातील सीमेवरील अविकसित गावांनी कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याला सर्वस्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी हेच पक्ष जबाबदार आहेत.’
काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आंदोलनात सहभागी झाल्याने या सगळ्या प्रकरणाचे शिंतोडे शिवसेनेवरही उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी या दोन पक्षांशी राजकीय तडजोड करावी, मात्र त्यांच्यासोबत प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी होताना विचार करावा, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
त्यामुळे एकीकडे शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्यासाठी विरोधकांकडून एकजुटीने मोर्चेबांधणी सुरू असताना, प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. आंबेडकर यांच्या या भूमिकेविषयी महाविकास आघाडीकडून कशा प्रकारे उत्तर दिले जातं, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
उद्धव ठाकरेंनी सल्ला ऐकला नाही!
या मोर्चातून शिवसेना आपली ताकद दाखवेल, याबाबत माझ्या मनात शंका नाही. सध्या शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या ताकदीवरच रस्त्यावर उतरा, असे मी उद्धव ठाकरेंना सांगितले होते. मात्र आम्ही सत्तेत एकत्र होतो, त्यामुळे या आंदोलनात काँग्रेस-राष्ट्रवादीलाही सामावून घ्यावे लागेल, असं उद्धव ठाकरेंनी सांगितल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community