आंबेडकरांची गुगली, ठाकरे धर्मसंकटात!

96

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत युती करण्यास वंचित बहुजन आघाडीने अनुकूलता दर्शवली असली, तरी ही युती महाविकास आघाडीसह असेल की केवळ ठाकरे गटासोबत, याबाबतचा निर्णय त्यांनी जाहीर करावा, अशी गुगली टाकत प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरे यांना धर्मसंकटात टाकले आहे.

सुरुवातीला वंचितचे राज्य समितीचे सदस्य महेंद्र रोकडे यांच्यासह काही नेत्यांची शिवसेनेचे नेते सुभाष देसाई आणि अन्य नेत्यांसोबत बैठक झाली. त्यानंतर सुभाष देसाई आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात युतीबाबत सकारात्मक चर्चा झाली. असे असले तरी या चर्चेबाबत इतक्यात सूतोवाच करू नयेत, अशी उद्धव ठाकरे यांची भूमिका होती.

(हेही वाचा ब्रिटनभोवती मुसलमानांचा विळखा, नव्या जनगणनेत धक्कादायक आकडेवारी समोर…)

कारण, महाविकास आघाडीत वंचितला सहभागी करून घेण्यास घटकपक्षांनी पुरेशी अनुकूलता दर्शविलेली नाही. शिवाय इतर पक्षांना बाजूला ठेवून एकट्या वंचितसोबत लढण्यास उद्धव ठाकरे तयार नाहीत. परिणामी, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांबाबतची भूमिका लक्षात घेऊनच पुढचे पाऊल टाकावे, अशी रणनीती उद्धवसेनेने ठरवली होती. मात्र, वंचितने उघड भूमिका घेत त्यांची एकप्रकारे कोंडी केली आहे.

आंबेडकरांनी घाई का केली?

संभाजी ब्रिगेडआधी वंचित बहुजन आघाडीने उद्धव गटापुढे युतीचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु, मागच्या दोन महिन्यांत त्याबाबत अंतिम निर्णय झाला नाही. दुसरीकडे युती झाल्यास वंचितला महाविकास आघाडीत कशाप्रकारे स्थान मिळेल, याबाबतही स्पष्टता नव्हती. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने, हो किंवा नाही, याचा निर्णय तत्काळ व्हावा, यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर भूमिका घेण्यास घाई केल्याचे कळते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.