१० ऑगस्टपर्यंत सर्व सुरु करा अन्यथा…

274

३१ ऑगस्टपर्यंत राज्यासह देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर चांगलेच आक्रमक झाले असून, आम्ही १० ऑगस्टपर्यंतची मुदत देतो, सगळं काही सुरू करा. आमचा अंत पाहू नका, आम्हाला कायदा मोडायला भाग पाडू नका. कधी काय उघडणार याचं शासनाने निश्चित वेळापत्रक सांगावं. रामभरोसे थांबवावं, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

कोरोना हॉटस्पॉटमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी मृत्यू झाले आहेत. त्यामुळे कोविडचा परिणाम आहे का नाही, याचा विचार करण्याची गरज आहे. पुण्यात गेल्यावर्षी मे महिन्यात ४,००७ मृत्यू झाले, यावर्षी मे महिन्यात १,६०५ मृत्यू झाले. मुंबईमध्ये मागच्यावर्षी ३,०४६ मृत्यू झाले, तर यावर्षी २,८६० मृत्यूंची नोंद झाली. केंद्र सरकारच्या विभागाकडून ही माहिती मिळाल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं. तसंच यावर्षी कोरोनामुळे किती मृत्यू झाले आणि इतर कारणामुळे किती मृत्यू झाले याची आकडेवारी सरकारने द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

लोकांचे हाल कधी थांबणार

अशा परिस्थितीमध्ये लोकांचे हाल कधी थांबणार? दुकानं कधी उघडणार? एसटी बस कधी सुरू होणार? राज्यात महापुराचं संकट येऊ घातलंय, कोविड कोविड करत बसण्यापेक्षा महापुराच्या प्रश्नाकडे कधी लक्ष देणार? ५ टक्के लोकांना अधिक धोका आहे, असं असताना ९५ टक्के लोकांना वेठीला का धरता? असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. कोरोनाच्या काळात परीक्षा न घेता पास करणं चुकीचं आहे. कोविडमुळे पास झाला, असे व्हायला नको. यावर्षी नाही, पुढच्यावर्षी परीक्षा घ्या, पण घ्या, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.