नवाब मलिकांकडून मुस्लिमांची दिशाभूल! काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

129

मराठा आरक्षणासोबतच मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण देण्याचा अध्यादेश काढण्यात आला होता. परंतु हे प्रकरण न्यायालयात गेले, आता एनसीपीचे प्रवक्ते नवाब मलिक हे 50 टक्के आरक्षणाच्या मर्यादेवर बोलत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर मुस्लिमांना आरक्षण देता येणार नाही, अशी भूमिका मांडत मुस्लिमांची दिशाभूल करत आहेत. मलिक यांची भूमिका संघासारखी आहे. मुस्लिमांना आरक्षण मिळू नये अशी संघाची भूमिका आहे. आता मलिकही याच बोटीतून प्रवास करताना दिसत आहे, असा टोला वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.

भाजप-राष्ट्रवादीचे संबंध जगजाहीर

राष्ट्रवादी आणि भाजपचे संबंध जगजाहीर आहेत. नवाब मलिक राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत, त्यामुळे ही भूमिका राष्ट्रवादीची आहे, असेही ते म्हणाले. मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण लागू करावे. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यामुळे आता प्रत्येक समाजाने मेळावे घेतले पाहिजे. त्याबाबतची जागृती केली पाहिजे. इम्पिरिकल डेटा का गोळा केला नाही, याचा जाब विचारला पाहिजे. सरकारची पोलखोल केली पाहिजे. गोवारी समाजासारखी अवस्था होऊ नये असे ओबीसींना वाटत असेल तर त्यांनी समाजात जागृती केली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

(हेही वाचा विधानसभा अध्यक्षांच्या निवडीत राज्यपालांचा हस्तक्षेप?)

राजकीय भूमिका घ्या

आम्ही ओबीसींच्या आरक्षणासाठी मोर्चा काढला. आता जिल्हा पातळीवर मोर्चे काढण्याची आमची तयारी सुरू आहे. आता ओबीसींना आरक्षणासाठी राजकीय भूमिका घेण्याची वेळ आली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेने आमच्याकडे मते मागायला येऊ नये, असे बोर्डच ओबीसींनी आपल्या घरावर लावले पाहिजे. मत हवे असेल तर आमचे आरक्षण आम्हाला परत करा, अशी मागणी ओबीसींनी लावून धरली पाहिजे. ओबीसींना आरक्षण मिळावे आणि या लढ्याला वेग मिळावा म्हणूनच आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.