गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर केंद्रीय निवडणूक आयोगानं शुक्रवारी महत्त्वापूर्ण निकाल दिला आणि राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला आयोगानं शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देऊन उद्धव ठाकरेंच्या गटाला मोठा धक्काच दिला. आता निवडणुक आयोगाच्या या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. याच पार्श्वभूमीवरून मित्र पक्षाचे म्हणजेच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
आंबेडकरांनी ठाकरेंना कोणता सल्ला दिला?
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, निवडणूक आयोगानं शुक्रवारी शिवसेनेच्या चिन्हाच्या प्रकरणावर आपला निकाल दिला. आणि आता या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरेंनी आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं सांगितलं. मी त्यांना सल्ला देतो, त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जावं. परंतु सर्वात मोठी ही गोष्ट आहे की, निवडणूक आयोगानं चिन्ह आणि पक्षातील वादावर निर्णय घेणं हे त्यांच्या अधिकारामध्ये येतं का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
निवडणूक आयोगाला निवडणूका घेण्यासाठी पूर्ण स्वतंत्र दिलं आहे. पण त्यांच्या या अधिकारांतर्गत पक्षात जे वाद होतात, त्या वादावर निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे का? या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि त्यांची सेना सर्वोच्च न्यायालयात गेले, तर त्यांना न्याय मिळेल, असं मला वाटतं. त्यामुळे त्यांनी या मुद्द्यावर याचिका दाखल करावी, असा आम्ही त्यांना सल्ला देतो, असं आंबेडकर म्हणाले.
(हेही वाचा – …पण एकदा का नाव गेलं की परत येत नाही! निवडणूक आयोगाच्या निर्णयावर राज ठाकरेंची सूचक प्रतिक्रिया)
Join Our WhatsApp Community